कोरडी होळी खेळा! टँकरने पाणी मिळणार नाही; महापालिकेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2023 09:43 PM2023-03-06T21:43:52+5:302023-03-06T21:44:20+5:30

Nagpur News होळीला रंग खेळण्याची परंपरा आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करून कोरडी होळी खेळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

Play Dry Holi! Water will not be supplied by tankers; Municipal decision | कोरडी होळी खेळा! टँकरने पाणी मिळणार नाही; महापालिकेचा निर्णय

कोरडी होळी खेळा! टँकरने पाणी मिळणार नाही; महापालिकेचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्दे दोन एमएलडी पाण्याची बचत

नागपूर : होळीला रंग खेळण्याची परंपरा आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे नैसर्गिक रंगांचा वापर करून कोरडी होळी खेळण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. एवढेच नव्हे तर पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी दि. ७ मार्च रोजी धुळवडीच्या दिवशी टँकरद्वारे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय जलप्रदाय विभागाने घेतला आहे.

फेब्रुवारीपासूनच सूर्य डोळे वटारू लागला. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. यावर्षी उन्हाळा अधिक कडक असेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. ही परिस्थिती पाहता मे महिन्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेने आतापासून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे नियोजन केले आहे. तीन वर्षांपूर्वी पेंच जलाशयातील साठा आटल्यामुळे नागपूर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ आली होती. जलाशयातील ‘डेड स्टॉक’ पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला होता.

जलवाहिनी नसलेल्या भागात महापालिका १९१ टँकरने, तर जलवाहिनी असलेल्या भागात ४७ टँकरने पाणीपुरवठा केला जातो. एका टँकरद्वारे ३ ते ४ हजार लिटर पाणीपुरवठा होतो. होळीच्या दिवशी तशीही पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे शहराच्या विविध भागांत टँकरची मागणीही वाढते. या दिवशी टँकरने पाणीपुरवठा बंद ठेवला तर दीड ते दोन एनएलडी पाण्याची बचत होईल.

 

पर्यावरणपूरक होळी साजरी करा

- नागपूरकरांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी. रंग खेळण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर टाळावा. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून आपले योगदान द्यावे.

- राधाकृष्णन बी., आयुक्त, महापालिका

Web Title: Play Dry Holi! Water will not be supplied by tankers; Municipal decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी 2023