पार्श्वगायक मुकेश रेल्वेने आले होते नागपुरात
By admin | Published: August 27, 2015 03:01 AM2015-08-27T03:01:26+5:302015-08-27T03:01:26+5:30
पार्श्वगायक मुकेश म्हणजे दर्दभऱ्या गीतगायनाचे सम्राटच. मुळात मुकेश अर्थात मुकेशचंद्र माथूर हे व्यक्तिमत्त्व देखणे होते.
नागपूरकरांची दाद मुकेशला बळ देणारी : दोन रात्र मुकेश थांबले होते शहरात
राजेश पाणूरकर नागपूर
पार्श्वगायक मुकेश म्हणजे दर्दभऱ्या गीतगायनाचे सम्राटच. मुळात मुकेश अर्थात मुकेशचंद्र माथूर हे व्यक्तिमत्त्व देखणे होते. खरे तर मुकेश यांना चित्रपटसृष्टीत नायक म्हणून नाव कमावायचे होते. पण नंतर असे काही घडले की मुकेश पार्श्वगायक म्हणून प्रसिद्ध झाले. चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ म्हणजे मो.रफी., किशोरदा आणि मुकेश असे त्रिकूटच होते. मुकेश यांच्याशिवाय चित्रपटसंगीताला पूर्णत्वच मिळू शकत नाही. आज मुकेश नाहीत पण त्यांचा दर्दभरा आवाज आणि त्यांची गीते रसिकांच्या ओठांवर आहे. पिढ्या बदलल्या पण प्रेयसीच्या विरहाची आर्तता असो वा प्रेमभंगाचे दु:ख, आजचा युवकही मुकेश यांच्या गीतांचाच सहारा घेतो.
मुकेश यांचा नागपूरशी अतिशय जवळचा संबंध राहिला. नागपुरात त्यांचे काही मित्र राहात होते. त्यांच्यापैकी कुणीही आज हयात नाहीत. नागपुरात त्यांचे फार कार्यक्रम आयोजित झाले नाही. पण वेगवेगळ्या निमित्ताने मुकेश यांचे नागपुरात येणे-जाणे राहिले. नागपूरची संत्री आणि अस्सल लज्जतदार वऱ्हाडी भोजनाचे मुकेश रसिक होते. मुकेश यांचा एकमेव जाहीर कार्यक्रम नागपुरात १९६१ साली झाला. त्यावेळी मुकेश चित्रपट क्षेत्रात उदयोन्मुख गायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करीत होते. नागपूर हे दर्दी रसिकांचे आणि संगीतावर प्रेम करणाऱ्यांचे शहर. त्यामुळे येथे त्या काळात शास्त्रीय संगीतासह सुगम गायनाच्याही मैफिलींचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत होते. काही घरगुती मैफिलींचाही त्या काळात शहरात सुकाळ होता. नागपूरच्या काही मंडळींनी १९६१ साली ज्येष्ठ पार्श्वगायक मो.रफी यांच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविले. त्यासाठी मित्रमंडळींनी एकत्रित येऊन उद्योगपतींकडून काही पैसे जमविले आणि कार्यक्रमाचे आयोजन केले. अॅडव्हान्स घेऊन जी मंडळी मो.रफी यांचा कार्यक्रम घेण्यासाठी मुंबईला गेली त्यांनी मात्र रफी साहेबांचा कार्यक्रम नागपूरऐवजी भिलाई येथे ठरविला. अर्थात तोपर्यंत नागपूरच्या कार्यक्रमाची तिकीट विक्री पूर्ण झाली होती. रफी साहेबांचा कार्यक्रम भिलाई येथे आयोजित केल्याचे कळल्यावर दोन गट पडले आणि बरीच वादावादी झाली. या क्षणापर्यंत या कार्यक्रमाच्या आयोजनाशी माझा कुठलाही संबंध नव्हता; पण आयोजन करणारे लोक माझ्या संपर्कातले होते, असे ज्येष्ठ पत्रकार उमेशबाबू चौबे यांनी सांगितले.
पण भांडण सोडविण्याच्या दृष्टीने मी मधात पडलो आणि मो.रफींऐवजी गायक मुकेश यांना आणण्याचे ठरविण्यात आले. पुन्हा निधी जमा करण्यात आला. सगळ्यांनी आग्रह केला म्हणून मी ५०० रुपये घेऊन मुकेश यांना आमंत्रण देण्यासाठी मुंबईला गेलो. पण मुकेश यांचा पत्ता माहीत नव्हता. मुकेश यांचा पत्ता मिळविण्यासाठी मी एका कोठ्यावर गेलो, तेथे पत्ता मिळालाच नाही, पण जान बची और लाखो पाये...अशी स्थिती झाली. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा पत्ता मिळविला आणि मुकेश यांच्या घरी गेलो. त्यावेळी त्यांचा मुलगा नितीन पाळण्यात झोपला होता आणि त्यांची पत्नी रुग्णालयात होती. सारी स्थिती मुकेश यांना सांगितल्यावर मुकेश यांनी नागपुरात कार्यक्रमासाठी येण्याचे मान्य केले. आमच्याजवळ पैसे कमी होते त्यामुळे मुकेश माझ्यासोबत रेल्वेनेच नागपुरात आले आणि मोर भवनमध्ये गीतांचा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी हा मोठा आणि अविस्मरणीय कार्यक्रम झाला, अशी आठवण उमेश चौबे यांनी सांगितली.
मुकेश यांच्या गीतांचे गायक राजू व्यास म्हणाले, मोरभवन येथे झालेल्या याच कार्यक्रमात मुकेश यांनी संगीतबद्ध केलेल्या अनुराग चित्रपटातील ‘किसे याद रखू किसे भूल जाऊ...’ या गीताने त्यांनी प्रारंभ केला होता. त्यावेळी ध्वनिव्यवस्था दामू मोरे यांनी पाहिली होती. गायक राजेश दुरुगकर म्हणाले, मुकेश यांच्या गीतांत कमालीचा दर्द आहे. पण मुकेश यांनी गायिलेली प्रेमगीते लाजवाब आहेत. ऐकताना सोपी वाटणारी ही गीते गायला तितकीच कठीण आहेत. भानुकुमार म्हणाले, मुकेश तर माझे दैवतच आहे.
ते एकदा नागपुरात येऊन गेले, ही आठवणच प्रेरणादायी आहे. त्याच मोरभवनला कार्यक्रम सादर करण्याची संधी मला मिळाली. मुकेशचे चाहते अरविंद पाटील यांनीही मुकेश यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुकेश यांच्या गीतात असणारा दर्द कुठेच सापडत नाही. त्यांचा आवाज सर्वांनाच सूट व्हायचा, ही त्यांच्या आवाजाची खासियत होती.