उपराजधानीतील माणकापूर क्रीडा संकुलात खेळाडूंचा गुदमरतोय श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:42 AM2019-09-20T11:42:52+5:302019-09-20T11:44:38+5:30
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या शालेय कराटे स्पर्धेदरम्यान जमलेल्या १८०० खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मानकापूर क्रीडा संकुलात कुठल्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने गुरुवारपासून आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसाच्या शालेय कराटे स्पर्धेदरम्यान जमलेल्या १८०० खेळाडूंसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मानकापूर क्रीडा संकुलात कुठल्याही सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या नव्हत्या. संकुलातील एसी बंद ठेवण्यात आल्याने खेळाडूंचा श्वास गुदमरतो आहे. पिण्याचे पाणी आणि शौचालयाचा अभाव असल्याने खेळाडूंची हेळसांड झाल्याची तक्रार सिव्हील राईट्स प्रोटेक्शन सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात केली.
पोलीस तक्रारीत ते म्हणाले,‘ कराटे स्पर्धकांनी शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत महिनाभराआधी ‘आॅन लाईन‘अर्ज केला. १४, १७ आणि १९ अशा वजन गटातील कराटे स्पर्धकांची माहिती जिला क्रीडा अधिकारी आणि आयोजकांना एक महिन्यापूर्वी होती. १८ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता सर्व खेळाडूंना मानकापूर संकुलात वजन करण्यासाठी बोलावण्यात आले होते. स्पर्धास्थळी वजन करण्यासाठी ना योग्य यंत्रे होती, ना पुरेसा स्टाफ. संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर तशी व्यवस्था करण्यात आली.
जेव्हा आॅनलाईन पध्दतीने नोंदणी करण्यात आली, तेव्हा संबंधित खेळाडूंना कराटे खेळण्याची तारीख कळविणे गरजेचे होते. परंतु १८ सप्टेंबरला वजन केल्यानंतर गुरुवारी सकाळी ९ वाजता बोलाविण्यात आले. परंतु ११ वाजले तरी स्पर्धा सुरू झाली नव्हती. ११.३० वाजता १४ वर्षे वयोगटात खेळाडूंची स्पर्धा सुरु झाली.
दुपारी २ वाजता, १७ आणि १९ वर्षे वयोगटासाठी उद्या दि. २० रोजी स्पर्धेचे आयोजन होईल, असे जाहीर करताच अनेक खेळाडू आणि पालकांना मनस्ताप झाला.आयोजन प्रमुख असलेले डीएसओ कार्यालयाचे क्रीडा अधिकारी अरुण बुटे यांची मनमानी आणि अनियंत्रित कामामुळे शाळेचा अभ्यास बुडाला. बुटे यांच्याविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आल्याचे जीवने यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याची त्यांनी तयारी केली आहे.
बुटे हे कुणाशीही उर्मट भाषेत बोलतात, असे काही अन्य पालकांनी लोकमतला फोन करुन सांगितले. स्पर्धा आयोजनात सहकार्य करणारे कराटे कोच झाकिर खान यांचीही वागणूक खेळाडूंसाठी अपमानास्पद अशी होती, असे जीवन यांचे म्हणणे आहे. या संदर्भात झाकीर खान यांना विचारणा केली असता आपण केवळ स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आलो होतो. कुणाशीही हुज्जत घातली नाही. १८०० खेळाडू एकाचवेळी येतील याचा अंदाज नसल्याने थोडी तारांबळ उडाल्याचे ते म्हणाले. जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी आपल्याकडे कुणीही तक्रार घेऊन आले नाही. असे काही घडले असेल तर उद्या सर्व माहिती घेऊ, असे सांगितले. क्रीडा संकुलातील अधिकाºयांकडे एसी सुरू करण्याची विनंती केली असता त्यांनी वीज बिल भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितले.