क्रीडांगणाचा निधी गडप?

By admin | Published: October 26, 2014 12:14 AM2014-10-26T00:14:27+5:302014-10-26T00:14:27+5:30

शासनाच्या पायका योजनेअंतर्गत आलेल्या निधीचे योग्यरीत्या योग्यठिकाणी समायोजन करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब भिवापूर तालुक्यातील बेसूर येथे उघडकीस आली.

Playground fund fall? | क्रीडांगणाचा निधी गडप?

क्रीडांगणाचा निधी गडप?

Next

बेसूर येथील ग्रामस्थांचा सवाल : ग्रामपंचायतीत सचिवाची मनमानी
अभय लांजेवार - उमरेड
शासनाच्या पायका योजनेअंतर्गत आलेल्या निधीचे योग्यरीत्या योग्यठिकाणी समायोजन करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब भिवापूर तालुक्यातील बेसूर येथे उघडकीस आली. या निधीतून क्रीडांगण आणि क्रीडा साहित्य खरेदी करण्यात येणार होते. मात्र त्याचे पुढे काय झाले, काहीच कळायला मार्ग नाही. त्यामुळे शासनाकडून आलेला लाखो रुपयांचा निधी कुणी गिळला, असा सवाल गावकरी विचारत आहेत.
पायकाचा आलेला निधी भलत्याच कामासाठी वापरण्यात आल्याच्या धक्कादायक नोंदी समोर आल्याने यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. बेसूर ग्रामपंचायतीत सचिवाची मनमानी सुरू असल्याची बोंबाबोंब गावकरी करीत सुटले असून शासनाच्या निधीची अफरातफर केल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी विविध विभागात आणि बड्या अधिकाऱ्यांकडे दिल्या आहेत. आता यावर काय कारवाई होणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
पायका योजनेच्या अनुषंगाने बेसूर ग्रामपंचायतीला सन २०११-१२ ला मैदान दुरुस्तीसाठी ४८ हजार रुपयांचा निधी आला. यादरम्यान ५० हजार रुपयांचा निधीही धनादेशाच्या स्वरुपात आला.
परंतु, खाते क्रमांक न दिल्याने सोबतच धनादेशाची तारीखही उलटून गेल्याने सदर ५० हजार रुपयांचा धनादेश परत गेल्याचे समजते. त्यानंतर सन २०१२-१३ ला २ लाख ५१ हजार १४६ रुपयांचा निधी ग्रामपंचायतकडे पायका योजनेच्या अनुषंगाने आला.
आतापर्यंत सुमारे तीन लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीला प्राप्त झाला. मात्र यापैकी क्रीडांगण खोदकामासाठी केवळ सहा हजार रुपये, क्रीडांगण साहित्यासाठी २० हजार रुपये तसेच मुरुमाचा खर्च २४ हजार असा एकूण ५० हजार रुपयांचा खर्च क्रीडांगणाच्या कामासाठी केल्याचे दिसून येत आहे.
आलेल्या निधीतून ५० हजारांचा खर्च झाल्याने उर्वरित अडीच लाख रुपयांचा निधी कोणत्या कामासाठी खर्च केला, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत आहे.
क्रीडांगणावर वृक्षारोपण
ग्रामपंचायतच्या सातबाराच्या नोंदीनुसार बेसूर येथे अर्धा एकर परिसरात खेळण्यासाठी मैदान मंजूर करण्यात आले आहे. झुडपी जंगल परिसरात हा भाग येत असून तो क्रीडांगणासाठी राखीव करण्यात आल्याची नोंद आहे. परंतु याठिकाणी सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत असून क्रीडांगणावर केलेला लाखो रुपयांचा निधी केवळ कचरा साठविण्यासाठी खर्च केला काय, असा सवाल ग्रामस्थांचा आहे. शिवाय सुमारे दोन वर्षापूर्वी क्रीडांगणाच्याच जागेवर वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. वृक्षारोपणासाठी गावात दुसरी जागाच नव्हती का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. याप्रकरणी सचिव बाळा देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु मोबाईल ‘नॉट रिचेबल’ होता.

Web Title: Playground fund fall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.