सुरेल सिनेसंगीताची आनंददायी मैफिल

By Admin | Published: June 30, 2016 03:02 AM2016-06-30T03:02:25+5:302016-06-30T03:02:25+5:30

महान पार्श्वगायक मो. रफी म्हणजे रसिकांच्या गळ्यातले ताईत. सिनेसंगीताचा प्रवास मो. रफींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे हे नाव.

A pleasant concert of Surail Cinebangeta | सुरेल सिनेसंगीताची आनंददायी मैफिल

सुरेल सिनेसंगीताची आनंददायी मैफिल

googlenewsNext

कलावंतांना प्रोत्साहन मिळावे
खा. दर्डा याप्रसंगी म्हणाले, शहरातील गुणी कलावंतांना प्रोत्साहन मिळायला हवे. आपल्यासारख्या रसिकांच्या आशीर्वादानेच हे कलावंत राष्ट्रीय स्तरावर स्वत:चे नाव उंच करतील. निरंजन बोबडे यांची प्रशंसा करून त्यांनी निरंजनला ‘ज्युनिअर रफी’ असे संबोधले.

स्वरतरंग संगीत अकादमीचे आयोजन : ‘हिट्स आॅफ मोहम्मद रफी’
नागपूर : महान पार्श्वगायक मो. रफी म्हणजे रसिकांच्या गळ्यातले ताईत. सिनेसंगीताचा प्रवास मो. रफींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, असे हे नाव. संगीताच्या क्षेत्रातले ते अनभिषिक्त सम्राट होते. त्यांनी गायिलेली गीते रसिकांच्या हृदयात घर करून आहेत. गीताचे सर्वच प्रकार त्यांनी ताकदीने हाताळले आहे. कव्वाली असो वा भावगीत, प्रेमगीत असो वा गझल, उडत्या चालीची गीते असो वा काळजाला भेदून जाणारी गीते रफी साहेब म्हणजे अजब रसायन होते. ते आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज, त्यांची गीते मात्र अजरामर आहेत. त्यांच्याच सुरेल गीतांचा गुलदस्ता आज नागपूरकर रसिकांची सायंकाळ स्वरात चिंब करणारा होता.
स्वरतरंग संगीत अकादमीच्यावतीने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘हिट्स आॅफ मो. रफी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची संकल्पना अकादमीचे संचालक आणि प्रसिद्ध गायक निरंजन बोबडे यांची होती. रफी साहेबांची सर्व प्रकारची गीते निरंजनने ताकदीने सादर करून रसिकांना नास्टॉल्जिक केले. निरंजनसह मंजिरी वैद्य, निमिषा हिने काही युगलगीते सादर केली. उत्कृष्ट वाद्यवृंद, तयारीचे गायक आणि गीताचा नेमका भाव समजून असलेले सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम संपूच नये, असे रसिकांना वाटले असणार. पण गोडी अपूर्णतेची ठेवत रफींच्या गीतांचा रसिकांनी आनंद घेतला. कार्यक्रमाला लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन राज्यसभा सदस्य विजय दर्डा विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘मन तरपत हरिदर्शन को आज...’ या गीताने निरंजनने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि त्यानंतर एकापेक्षा एक सरस लोकप्रिय गीतांनी रसिकांचा ताबा घेतला. कार्यक्रमात निरंजन बोबडे, मंजिरी वैद्य, नंदू अंधारे, निमिषा श्रीवास्तव, इसाबुल हसन यांनी गीत सादर केले. पण या कार्यक्रमाचा प्रमुख भाग निरंजन बोबडेच होता. रफी साहेबांची गीते गाण्यासाठी कठीण आहे. शास्त्रीय रागांच्या सुरावटी, आलापी, ताना रफी साहेबांनी मोठ्या खुबीने गाण्यात गायिल्या आहेत. त्यामुळेच त्यांची गीते सादर करण्यासाठी गायक तयारीचाच असणे आवश्यक आहे. निरंजनने ही सारीच गीते तबियतीने सादर करून रसिकांची दाद घेतली. वन्समोअरची दाद घेत कार्यक्रम रंगत गेला. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)

स्वरांचा रंगलेला काफिला
याप्रसंगी ‘तूम मुझे यू भूला ना पाओगे.., वो जब याद आए.., मधुबन मे राधिका नाचे रे..., दर्दे दिल दर्दे जिगर..., गम उठाने के लिये..., कुहू कूहू बोले कोयलिया..., मेरे मेहबूब तुझे..., है अगर दुश्मन..., मै जट यमला पगला दिवाना..., हुई शाम उनका खयाल आ गया..., हम काले है तो क्या हुआ..., जीवन मे पिया तेरा साथ रहे..., मेरे यार शब्बा खैर..., अजहु न आए बालमा..., अभी ना जाओ छेडकर...’ आदी लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाला रसिकांची दाद मिळाली. गायकांना सिंथेसायझरवर प्रशांत खडसे, महेंद्र ढोले, गिटारवर गौरव टांकसाळे, आॅक्टोपॅडवर सुभाष वानखेडे, ढोलकीवर पंकज यादव तर तबल्यावर प्रशांत नागमोते यांनी साथसंगत केली. ध्वनी आॅडिओलॉजीचे स्वप्नील उके यांचा होता. मंच सजावट राजेश अमीन यांची तर प्रकाशव्यवस्था विशाल यादव यांनी केली. खा. विजय दर्डा यांनी यावेळी ‘जानेवाले कब लौट के आते है...’ या गीताची फर्माईश केली. पण व्यस्ततेमुळे ते परत निघाले. या दरम्यान निरंजन आणि निमिषा यांनी ‘अभी ना जाओ छोडकर...’ या गीताचे सादरीकरण सुरू केले. याप्रसंगी खा. दर्डा यांनी पुन्हा सभागृहात येऊन हे गीत पूर्ण ऐकले. कार्यक्रमाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, सुधीर घिके प्रामुख्याने उपस्थित होते.
 

Web Title: A pleasant concert of Surail Cinebangeta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.