शास्त्रीय गायन आणि वादनाची आनंददायी अनुभूती
By Admin | Published: July 29, 2014 12:49 AM2014-07-29T00:49:45+5:302014-07-29T00:49:45+5:30
शास्त्रीय संगीतातील बंदिशीचे माधुर्य, सुरेल बासरीवादन, तबल्यातून निघणारा नाद आणि खंजिरीची साद अशा बहुरंगी संगीताचा आनंद नागपूरकर रसिकांनी मनसोक्त अनुभवला. स्वानंदी संगीत सभेच्या
स्वानंदी संगीत सभेचा शतकोत्तरी संगीत समारोह : रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागपूर : शास्त्रीय संगीतातील बंदिशीचे माधुर्य, सुरेल बासरीवादन, तबल्यातून निघणारा नाद आणि खंजिरीची साद अशा बहुरंगी संगीताचा आनंद नागपूरकर रसिकांनी मनसोक्त अनुभवला. स्वानंदी संगीत सभेच्या शतकपूर्तीनिमित्त स्वानंदी युवा संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंटिफिक सभागृहात आयोजित या संगीत सोहळ्यात नवोदित कलावंतांनी शास्त्रीय संगीताचे वैविध्यपूर्ण सादरीकरण केले.
नवोदित प्रतिभावान कलाकार सायली आचार्य, श्रुती पांडवकर, रेणुका इंदूरकर, परिमल कोल्हटकर, आदित्य गोगटे, तुषार सूर्यवंशी, तरुण लाला या कलावंतांनी संगीत सोहळ्यात अतिशय दर्जेदार सादरीकरण केले. सायलीच्या गायनाने सभेची सुरुवात झाली. शास्त्रीय संगीताची साधना करणाऱ्या सायलीने निकोप, सुरेल आवाजात ‘राग मधुवंती’चे सादरीकरण केले. विलंबित एकतालातील ‘मै तो कैसे समझावू, मेरी तरसत अखियाँ...’, ‘मै आऊ तेरे मंदरवा बलिहारी...’ या बंदिशी तिने सादर केल्या. यानंतर आदित्य गोगटे याने सुरेल बासरीवादन केले. त्याने बासरीवादनातून ‘राग दर्गा’ आणि ‘राग देश’ अगदी सरलतेने सादर करून आपल्या प्रतिभेचा परिचय दिला. श्रुती पांडवकरचे राग बागेश्रीतील ‘मोहे मनावन आये हो...’, ‘मानेना सखी संैय्या मोरा...’ हे सादरीकरण आनंददायी होते. राग बसंतीमध्ये तिने ‘गरजत घन आयोरी...’ ही बंदिश सादर केली. दिग्गज गुरूंच्या तालमीत संगीताची साधना करणारी व भावपूर्ण स्वरसाजाची सुपरिचित युवा गायिका रेणुका इंदूरकर हिने यावेळी ‘मोरे मन भाये...’, ‘खेल रही मन भावन कलियाँ...’ या बंदिशीचे सादरीकरण केले. परिमल कोल्हटकर याने राग बिहागडामध्ये ‘प्यारी पग होले होले धरिये...’ व ‘कैसे आऊ पिया मै तोरे पास...’ या बंदिशी सादर केल्या. तरुण लाला याच्या तबलावादनातून निघालेला नाद आणि तुषार सूर्यवंशीच्या खंजिरीची साद याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचे संचालन तृष्णा आंबेकर व आभारप्रदर्शन साधना शिलेदार यांनी केले. ज्येष्ठ तबला कलाकार राजू गुजर यांच्या हस्ते सहभागी कलाकारांचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)