इंदोऱ्यातील नामांतर शहीद स्मारकाची दुर्दशा

By admin | Published: September 10, 2015 03:37 AM2015-09-10T03:37:20+5:302015-09-10T03:37:20+5:30

नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामठी रोडवरील इंदोरा दहा नंबर पूल येथे उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाला अवघे दोन वर्ष लोटले आहेत.

Plight of Martyr Memorial in Indore | इंदोऱ्यातील नामांतर शहीद स्मारकाची दुर्दशा

इंदोऱ्यातील नामांतर शहीद स्मारकाची दुर्दशा

Next

प्रशासनाचे दुर्लक्ष : पाण्याचे फवारे बंदच
नागपूर : नामांतर लढ्यातील शहीद भीमसैनिकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ कामठी रोडवरील इंदोरा दहा नंबर पूल येथे उभारण्यात आलेल्या नामांतर शहीद स्मारकाला अवघे दोन वर्ष लोटले आहेत. परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या दोन वर्षातच या स्मारकाची दुर्दशा झाली आहे. येथील पाण्याचे फवारे बंद असून सुरक्षा भिंतीवरील दिवे सुरूच झालेले नाहीत.
औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यासाठी लढण्यात आलेले आंदोलन हे नामांतराचे आंदोलन म्हणून ओळखले जाते. १९७८ ते १९९४ असे इतके प्रदीर्घ काळापर्यंत हे आंदोलन चालले. या आंदोलनादरम्यान नागपूर ते औरंगाबाद दरम्यान ऐतिहासिक असा लाँग मार्च काढण्यात आला होता. प्रदीर्घ काळ चाललेल्या या आंदोलनादरम्यान सुहासिनी बनसोड, गोविंद भुरेवार, भालचंद्र बोरकर, रोशन बोरकर, अविनाश डोंगरे, नारायण गायकवाड, शब्बीर अली काजल हुसैन, चंदर कांबळे, पोचिराम कांबळे, डोमाजी कुत्तरमारे, जनार्दन मवाळे, जनार्दन मस्के, रतन मेंढे, कैलाश पंडीत, रतन परदेशी, दिलीप रामटेके, ज्ञानेश्वर साखरे, अब्दुल सत्तार, प्रतिभा तायडे, दिवाकर थोरात, गौतम वाघमारे मनोज वाघमारे, शीला डोंगरे आदींसह २७ भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. नामांतराच्या या लढ्यातील या शहीद भीम सैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महानगरपालिकेतर्फे इंदोरा १० नंबर पुलाजवळ सुंदर असे स्मारक उभारण्यात आले आहे.
नामांतरासाठी आंदोलन करीत असलेले भीमसैनिक आणि त्यांच्यावरील लाठीहल्ला याचा सुंदर असावा देखावा तयार करण्यात आला आहे. नामांतराच्या आंदोलनात शहीद झालेल्या सर्व शहीद भीमसैनिकांची नावे कोरण्यात आली आहेत. चारही बाजूंनी सुरक्षा भिंत. त्यावरील कोरीव काम करून दिवे बसवण्यात आले. संपूर्ण स्मारकात सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. एक छोटेखानी खुले रंगमंच उभारण्यात आले. तसेच स्मारकाच्या मधोमध पाण्याचे फवारे असलेले दोन टाके तयार करण्यात आले आहे. या फवाऱ्यांवर सुंदर लाईट इफेक्ट करण्याच्या दृष्टीने लाईट्स लावण्यात आलेले आहे. २०१३ मध्ये हे स्मारक पूर्ण झाले. मोठ्या थाटात त्याचे लोकार्पण करण्यात आले.
या स्मारकात दरदिवशी सायंकाळच्या सुमारास नागरिक फिरायला येतात. ४ आॅगस्ट या दिवशी तर मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. दोन वर्षात स्मारकाची दुर्दशा पाहून नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
महापौरांशी चर्चा करणार
नामांतर शहीद स्मारकाची दोन वर्षातच दुर्दशा व्हावी, हे योग्य नाही. काही अडचणी असतील तर त्या लगेच दूर केल्या जातील आपण स्वत: यासंदर्भात महापौरांशी भेटून चर्चा करू आणि स्मारकातील समस्या दूर करू.
-डॉ. मिलिंद माने, आमदार
शौचालयाची दयनीय अवस्था
स्मारक परिसरात शौचालय बांधण्यात आले आहे. परंतु त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, त्यात कुणी जाऊच शकत नाही. दरवाजा कुलुप लावून बंद करण्यात आला आहे. स्मारकातील झाडांची व्यवस्था सध्या चांगली आहे. परंतु स्मारकाच्या चारही बाजूंनी लावलेले दिवे मात्र बंद आहेत.
गणेश पाठराबे, नागरिक

पाण्याची व्यवस्था नाही
स्मारक अतिशय सुंदर असे बांधण्यात आले. परंतु त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र लक्ष नाही. सुरक्षेच्या दृष्टीने स्मारकात २४ तास एका गार्डची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु स्मारकात साध्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिकांना मोठी अडचण होते. पाण्याची व्यवस्था नसल्याने पाण्याचे फवारेसुद्धा बंद पडले आहेत.
विनोद सोमकुवर - नागरिक

Web Title: Plight of Martyr Memorial in Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.