हिंगणा एमआयडीसीची दुर्दशा; ७५ हजार कामगारांच्या आरोग्याला धोका, गटारातील पाणी रस्त्यावर
By मोरेश्वर मानापुरे | Published: February 29, 2024 11:29 PM2024-02-29T23:29:42+5:302024-02-29T23:29:53+5:30
विकास आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष, सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे, अंतर्गत भागात खड्ड्यात रस्ते !
मोरेश्वर मानापुरे, नागपूर: देशाचे पंतप्रधान स्वच्छतेवर अधिक भर देतात. पण त्या विपरित स्थिती हिंगणा येथील औद्योगिक वसाहतीची आहे. ५४ वर्षांपासून हजारो लोकांना रोजगार देणाऱ्या या क्षेत्रातील प्रत्येक मार्गाच्या कडेला घाणीचे साम्राज्य आहे. कर स्वरुपात कोट्यवधींची वसुली करणारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि संबंधित ग्रामपंचायतींनी या क्षेत्राच्या विकासाकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले.
कचऱ्याचे ढिगारे, गटाराचे पाणी रस्त्यावर !
अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आणि गटारातील पाणी वारंवार रस्त्यावर वाहते, अशी या क्षेत्राची स्थिती आहे. कारखान्यांमधील सांडपाणी वाहून नेण्यासाठी सिव्हरेज लाईन नाही. रस्त्यावरील कचरा उचलण्यासाठी असोसिएशन आणि उद्योजकांना स्व:खर्चाने गाडी मागवावी लागते. एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण परिसर स्वच्छ राखण्यासाठी लढा देत आहेत.
पिण्याचे पाणी आणावे लागते घरूनच
हिंगणा औद्योगिक क्षेत्र सर्वात जुने आहे. १८९० एकरात १६६१ प्लॉट आहेत. यातील १३०० पेक्षा कमी प्लॉटवर कारखाने सुरू आहेत. मुख्य रस्त्यावर शोरूम उभ्या राहिल्या आहेत. या कारखान्यांमध्ये जवळपास ७५ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. काही उद्योग २४ तास सुरू राहतात. ग्रामीण भागात असलेली घाणीची स्थिती या क्षेत्रात अनेकदा पाहायला मिळते. घाण पाणी वाहून जात नसल्यामुळे बहुतांश कारखान्यांमध्ये टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. टाक्या पूर्णपणे भरल्यानंतर रिक्त करण्यासाठी उद्योजकांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. उद्योजकांना उत्पादनांव्यतिरिक्त परिसरातील घाण साफ करण्यावर जास्त भर द्यावा लागतो. अनेकजण कचरा खुल्या मैदानात टाकतात. कचऱ्याचे ढिगारे तयार झाल्यामुळे आजाराचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. प्रत्येकाला घरूनच पिण्याचे पाणी सोबत आणावे लागते.
एमआयडीसीकडून नेहमीच मिळते आश्वासन
हिंगणा औद्योगिक क्षेत्रातील समस्यांच्या बाबतीत उद्योग मंत्री आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीच आश्वासन मिळते. येथील समस्या सोडविण्याकडे अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून दुर्र्लक्षच झाले आहेत. वरिष्ठांच्या दणक्यानंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली जाते. काही दिवसानंतर स्थिती ‘जैसे थे’ होते. एमआयडीसीने खासगी एजन्सीची नियुक्ती करून स्वच्छता राखण्यावर भर देण्याची गरज असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. कठोर नियम आणि मार्गदर्शन तत्त्वे जारी करण्याची गरज आहे. त्यानंतरच एमआयडीसी हिंगणा औद्योगिक परिसर स्वच्छ राहील, असा पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे.
हिंगणा एमआयडीसीची वैशिष्ट्ये
- जवळपास ५५ वर्षांपूर्वी स्थापना.
- स्थापनेपासून सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही.
- हिंगणा एमआयडीसी १८९० एकर जागेत, १६६१ प्लॉटचे वितरण, १३०० पेक्षा कमी कारखान्यांमध्ये उत्पादन.
- जवळपास ७५ हजार जणांना रोजगार.
एमआयडीसीचा केवळ वसुलीवर भर; स्वच्छता कोण करणार?
एमआयडीसीचे अधिकारी थातूरमातूर स्वच्छता मोहीम राबवून आपल्याच पायावर धोंडा मारून घेते. अखेर असोसिएशन आणि उद्योजकांना पुढाकार घ्यावा लागतो. या क्षेत्रात जवळपास ७५ हजार कामगार काम करतात. त्यानंतरही या क्षेत्राकडे दुर्लक्षच आहे. औद्योगिक रसायनयुक्त पाण्याला टाकीमध्ये जमा करावे लागते. त्यामुळे आजाराचा धोका निर्माण होतो. या संदर्भात एसआयसीला पत्र लिहिले आहे, पण अधिकारीही याकडे कानाडोळा करतात. मात्र कर वसुलीसाठी पुढाकार घेतात. एमआयडीसीने उद्योजक आणि कामगारांना वाऱ्यावर सोडले आहे.
-कॅ. सी.एम. रणधीर, अध्यक्ष, एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन.