यादीतील प्रकल्पग्रस्तांना आज भूखंड वाटप
By admin | Published: January 18, 2017 02:21 AM2017-01-18T02:21:25+5:302017-01-18T02:21:25+5:30
शिवणगावातील प्रकल्प्रगस्तांना जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम यादीनुसार चार टप्प्यात १११३ जणांना चिचभुवन येथील विकसित जमिनीवर भूखंडाचे वाटप करण्यात येत आहे.
चौथ्या टप्प्यात ३६९ भूखंड वाटप : वगळलेल्यांचा सर्वेक्षणानंतर पुनर्विचार
नागपूर : शिवणगावातील प्रकल्प्रगस्तांना जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतिम यादीनुसार चार टप्प्यात १११३ जणांना चिचभुवन येथील विकसित जमिनीवर भूखंडाचे वाटप करण्यात येत आहे.
चौथ्या टप्प्यात बुधवार, १८ जानेवारीला महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मध्यवर्ती इमारतीतील सभागृहात ३६९ भूखंडाचे वाटप करण्यात येणार आहे. ३००० ते ७५०० चौरस फूट क्षेत्रफळाचे भूखंड वाटप होणार आहे.
बुधवारी वाटप करण्यात येणाऱ्या भूखंडामध्ये तीन हजार चौ. फूटाचे १९१, ३५०० चौ. फूटाचे ८४, चार हजार चौ. फूटाचे ४७, ४५०० चौ. फूटाचे २४, पाच हजार चौ. फूटाचे १५, सहा हजार चौ. फूटाचे ५, ६५०० चौ. फूटाचा एक, सात हजार चौ. फूटाचा एक आणि ७५०० चौ. फूटाचा एक भूखंड वाटप करण्यात येणार आहे. यादीनुसार भूखंडाचे वाटप होईल, पण न्यायालयीन प्रकरणे आणि कागदपत्रांमध्ये त्रुटी असलेल्यांना भूखंड देण्यात येणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्रूटी आणि न्यायालयीन प्रकरणांमुळे पहिल्या टप्प्यातील एक हजार चौ.फूट भूखंडाच्या वाटपात २४, दुसऱ्या टप्प्यात ६५ आणि तिसऱ्या टप्प्यात ८ प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्यात आलेला नाही. विक्तुबाबानगरात अनेकांनी नव्याने झोपड्या टाकून भूखंड बळकविण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या टप्प्यातही हीच स्थिती होती. तिसऱ्या टप्प्यात आठही भूखंडाची प्रकरणे न्यायालयात आहेत. त्यामुळे त्यांना भूखंड देण्यात आले नाही. पण नव्याने सर्वेक्षण करून खऱ्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
खऱ्या प्रकल्पग्रस्तांना भूखंड मिळावा, असा आमचा प्रयत्न आहे. कुणीही वंचित राहू नये, यावर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. चौथ्या टप्प्यात वाटप करण्यात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांची योग्य तपासणी करण्यात येत आहे.
तीन हजार चौरस फूटाचे भूखंड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. जर त्या शेतकऱ्याला एक मुलगा असेल तर तीन हजारासह अतिरिक्त ५०० चौरस फूट आणि दोन, तीन किंवा चार मुले असेल तर त्यांना शेतकऱ्याच्या तीन हजार चौरस फूट भूखंडात अनुक्रमे १०००, दीड हजार आणि दोन हजार अतिरिक्त चौरस फूट जागेची भर पडणार आहे.
अशाप्रकारे ३५००, ४०००, ४५०० आणि ५००० हजार चौरस फूट भूखंडाची कागदपत्रे शेतकऱ्याला देण्यात येणार आहे. तसेच यादीत नोंद असलेल्यांना ६०००, ६५००, ७००० आणि ७५०० चौ.फूट भूखंडाची कागदपत्रे देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)