पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नागपूरसह ५ रेल्वेस्थानकांवर ओएसओपीचे उद्घाटन
By नरेश डोंगरे | Published: March 11, 2024 10:23 PM2024-03-11T22:23:43+5:302024-03-11T22:23:55+5:30
नागपूर विभागातील १० ठिकाणी प्रकल्प : मुकूटबनला गती शक्ती कार्गो टर्मिनल्स, तर राजूरच्या नवीन गुड्स शेडचे लोकार्पण.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी, १२ मार्च रोजी नागपूरसह विभागातील ४ रेल्वेस्थानकांवर ओएसओपीचे उद्घाटन तर बडनेरा, अकोला आणि नागभीडसह अन्य तीन ठिकाणी विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले जाणार आहे. हे सर्व कार्यक्रम दिल्लीतून ऑनलाईन पार पडणार आहेत.
पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मंगळवारी देशभरात ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण करणार आहेत. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील 'बॉटल नेक' म्हणून ओळखला जाणाऱ्या नागपूर - वर्धा मार्गाच्या तिसऱ्या आणि चवथ्या रेल्वे लाईनच्या लोकार्पणाचाही समावेश आहे. या संबंधाने मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी आज पत्रकारांना माहिती दिली. नागपूर रेल्वे स्थानक, पांढूर्णा, पुलगाव, बल्लारशाह, बैतूल या पाच रेल्वेस्थानकावर स्थानिक उत्पादकांना ग्राहक मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ओएसओपी (एक स्थानक, एक उत्पादन) स्टॉलचे उद्घाटन होईल. बडनेरा येथील वॅगन दुरुस्ती कार्यशाळा, अकोला येथील रेल कोच रेस्टॉरंट आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथील जनऔषधी केंद्राच्या लोकार्पणाचाही यात समावेश आहे. त्याचप्रमाणे मुकूटबन स्थानकावर गती शक्ती कार्गो टर्मिनलचे लोकार्पण, तर राजूर स्थानकावर राजूर गुडस् शेडचे लोकार्पण केले जाईल. खापरी, सेवाग्राम आणि तिगाव स्थानकावर थर्ड आणि फोर्थ लाईनच्या लोकार्पणाचा कार्यक्रम ऑनलाईन (व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून) पार पडेल, असेही अग्रवाल यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, एडीआरएम टी. एस. खैरकर, सिनियर डीईएन पद्मनाभन झा, सीनियर डीएससी मनोज कुमार आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
अशाच प्रकारे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (दपूम) अंतर्गत येणाऱ्या कळमना - राजनांदगाव दरम्यानच्या कन्हान ते धनाैली सालवा, गुदमा पर्यंतच्या तिसऱ्या रेल्वे लाईने लोकार्पण केले जाणार आहे. नव्या वंदे भारत ट्रेन तसेच ४ वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार होईल. १७ स्थानकांवर ओएसओपी स्टॉल, तीन नवीन गुडस् शेड, दोन जन औषधी केंद्रे आणि गती शक्ती कार्गोचेही लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचे दपूमच्या विभागीय व्यवस्थापक नम्रता त्रिपाठी यांनी सांगितले. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह उपस्थित होते.