कोरोनाविरोधातील लढ्यात उत्तम कामगिरी; पंतप्रधानांकडून नागपूरच्या पारिचारिकेची प्रशंसा
By सुमेध वाघमार | Published: September 10, 2022 05:26 PM2022-09-10T17:26:10+5:302022-09-10T17:31:41+5:30
राज्य माहिती आयुक्त पांडे यांच्या हस्ते पत्र प्रदान
नागपूर : कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल दंदे हॉस्पिटल्सच्या वरीष्ठ परिचारिका आशा सरदार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र पाठवून कौतुक केले. राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते आशा सरदार यांना हे पत्र प्रदान करण्यात आले.
हॉस्पिलटल्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी अध्यक्षस्थानी होते. तर दंदे हॉस्पिटल्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पिनाक दंदे, संचालक डॉ. सीमा दंदे व छातीरोगतज्ज्ञ डॉ. सुशांत मुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. लसीकरणाच्या मोहिमेतील आपल्या सक्रीय सहभागामुळे भारताला नवा इतिहास रचता आला. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नांमध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावली. या अभियानात आपण अग्रस्थानी येऊन जबाबदारी पार पाडल्याबद्दल आपलं मन:पूर्वक अभिनंदन, या शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी परिचारिका आशा सरदार यांचे कौतुक केले.
राहुल पांडे यांनी कोरोना काळातील सेवाकार्याबद्दल हॉस्पिटलचे कौतुक केले. डॉ. पिनाक दंदे म्हणाले, लसीकरणाच्या मोहिमेत आशा सरदार यांच्यासह सर्व सहकाऱ्यांनी समर्पणाच्या भावनेतून कार्य केले. त्याची दखल भारत सरकारने घेतली, याचा आनंद आहे. डॉ. सीमा दंदे यांनी या पत्राचे वाचन केले. यावेळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांचाही गौरव करण्यात आला.