पंतप्रधान मोदी साधणार विद्यार्थ्यांशी संवाद; मंगळवारी प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियानाचा शुभारंभ
By आनंद डेकाटे | Published: February 19, 2024 06:31 PM2024-02-19T18:31:06+5:302024-02-19T18:32:01+5:30
अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
नागपूर: भारत सरकारच्या उच्चत्तर शिक्षा विभागातर्फे देशभरातील सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालये यांच्या सशक्तीकरणासाठी महत्वकांक्षी प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान सुरू केले जात आहे. या महत्त्वकांक्षी अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी हे देशभरातील विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील तळमजल्यावरील सभागृहात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
या अभियान अंतर्गत एकूण १२९०६.१ कोटी रूपये इतकी भक्कम राशी देशभरातील सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालय यांच्या सहशक्तीकरणाकरिता मंजूर करण्यात आली आहे. याद्वारे सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालयांना समभागिता व उत्कृष्टता याकरिता आर्थिक बळ प्राप्त होणार आहे. प्रधानमंत्री उच्चत्तर शिक्षा अभियान अंतर्गत विद्यापीठातील रुसा केंद्राला मंजूर निधीची घोषणा पंतप्रधान मोदी यांच्याकडून केली जाणार आहे. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांची उपस्थिती राहणार आहे.