भारताला जगात अव्वल बनवणं हाच PM मोदींचा संकल्प, १३० कोटी जनतेनं एक पाऊल पुढे टाकावं; अमित शाह यांची साद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2023 01:59 PM2023-02-18T13:59:51+5:302023-02-18T14:00:11+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल.
नागपूर-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प केला आहे की २०४७ पर्यंत भारत जगातं नेतृत्व करताना दिसेल. यासाठी देशातील प्रत्येक नागरिकानं एक पाऊल पुढे टाकलं तरी देश १३० कोटी पावलं पुढे जाऊ शकतो इतकी आपल्या देशाची ताकद आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले. ते नागपूर लोकमतच्या सुवर्ण महोत्सव आणि जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्ष सोहळ्यात बोलत होते.
"आज राजकारणात एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागतात, पण.."; फडणवीसांचं महत्वाचं विधान!
अमित शाह यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात झालेल्या बदलांची आणि घेतल्या गेलेल्या कटू निर्णयांमुळे देशाला मिळालेली नवी दिशा याबाबत माहिती दिली. "भारत आज वेगानं पुढे जात आहे. मला विश्वास आहे की पंतप्रधान मोदींनी जो संकल्प केला आहे की २०४७ साली भारत जगात अव्वल झाला पाहिजे. कदाचित त्यावेळी आपल्यापैकी अनेकजण नसतीलही. पण मी इतकं विश्वासानं सांगू शकतो की २०४७ मधील युवा जगातील अव्वल भारताचं प्रतिनिधीत्व करणारा असेल. जर १३० कोटी जनता तर पाऊल पुढे आली तर संपूर्ण देश १३० पावलं पुढे जातो ही आपली ताकद आहे", असं अमित शाह म्हणाले.
भारताला जगात अव्वल बनवणं हेच लक्ष्य
भारत जगात सर्वप्रथम झाला पाहिजे हेच लक्ष्य घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत, असं अमित शाह म्हणाले. "स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सध्या सुरू आहे आणि यात आज आपण पुढे गेलो आहोत. आम्ही कधीच मतांचं राजकारण केलं नाही. मोदीजी सत्तेत येण्याआधी देशात अंतर्गत सुरक्षेबाबतचे तीन मोठे हॉटस्पॉट होते. जम्मू-काश्मीर, नॉर्थ-इस्ट आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेला भाग जो महाराष्ट्र, विदर्भाच्या सीमेतही आहे. मी आज दाव्यानं सांगू शकतो की या तिन्ही क्षेत्रात हिंसाचाराच्या घटनांमध्ये ८० टक्के घट करण्याचं काम मोदींच्या नेतृत्त्वात झालं आहे. कलम ३७० हटवलं तेव्हा संसदेत भाषणं ठोकली गेली काश्मीरात रक्ताचे पाट वाहतील. रक्ताचे पाट सोडा साधे लहान दगड देखील कुणी मारू शकलं नाही. दगडफेक व्हायची, हिंसाचार व्हायचा आता सगळं बंद झालं. आता काश्मीरात थिएटर चालतात, गुण्यागोविंदानं सर्व राहतात आणि १ कोटी ८० लाख पर्यटकांनी काश्मीला एका वर्षात भेट दिली आहे. गेल्या ७० वर्षात काश्मीरमध्ये १२ हजार कोटींची गुणवणूक आली. पण गेल्या ८ वर्षात आम्ही १२ हजार कोटी काश्मीरमध्ये गुंतवणूक आणली", असं अमित शाह म्हणाले.