आचारसंहितेमुळे मोदींचा नागपूरकरांशी संवाद रद्द; सहा डिसेंबरला होणार होता कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:11 AM2021-11-11T08:11:41+5:302021-11-11T08:11:49+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातच नव्हे, तर जगभरात अभिवादन केले जाते.
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना जाहीर अभिवादन करणार होते, तसेच दिल्ली येथून ते नागपूरकरांशी संवादही साधणार होते. त्याची तयारीही पूर्ण झाली होती. मात्र, यादरम्यान विधान परिषदेच्या निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आल्याने हा संवाद कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातच नव्हे, तर जगभरात अभिवादन केले जाते. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्वच मंत्री, राजकीय पक्षांचे नेते अभिवादन करीत असतात; परंतु यावर्षी अभिवादनासोबतच त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकत थेट नागरिकांशी संवाद साधण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. यासाठी काही विशेष शहरांची निवड करण्यात आली होती. यात दिल्ली, नागपूर, मुंबई व महू (मध्य प्रदेश) शहरांचा समावेश होता. ६ डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार होता. त्याचे थेट प्रक्षेपणही होणार होते. मात्र, विधान परिषदेच्या निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने आचारसंहितेमुळे पंतप्रधानांचा होणारा हा संवाद कार्यक्रम रद्द करण्यात आला.