नागपूर, अजनी रेल्वेस्थानकाच्या योजनेची पायाभरणी; लोको मेंटेनन्स डेपो, कोहळी-नरखेड मार्गाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 05:52 PM2022-12-12T17:52:54+5:302022-12-12T17:59:55+5:30
नागपूर, अजनी या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या विकासाचा मार्ग मोकळा
नागपूर :नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्यांनी नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. तसेच अजनी लोकोमोटिव्ह शासकीय मेंटेनन्स डेपो आणि नागपूर-इटारसी थर्ड लाईन प्रकल्पाच्या कोहळी-नरखेड या ४९.७४ किलोमीटरच्या मार्गाचे लोकार्पण केले.
नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. त्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे कंत्राट ५८९.२२ कोटी आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे कंत्राट ३५९.८२ कोटींना देण्यात आले आहे. या पुनर्विकासाच्या प्रकल्पाची पाहणी नरेंद्र मोदींनी करून या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. त्यानंतर अजनीत ११० कोटी रुपये खर्चुन साकारण्यात आलेल्या १२००० हॉर्स पॉवर डब्ल्यूएजी १२ श्रेणीच्या मालवाहतूक लोकोमोटिव्हसाठी शासकीय मेंटेनन्स डेपो तयार करण्यात आला आहे.
या डेपोचे लोकार्पणही पंतप्रधानांनी केले. तसेच नागपूर-इटारसी थर्ड लाईन प्रकल्पाच्या कोहळी-नरखेड या ४५३ कोटी रुपयांच्या ४९.७४ किलोमीटर मार्गाच्या कोनशिलेचे अनावरण त्यांनी केले. पंतप्रधानांनी अजनी आणि नागपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केल्यामुळे या दोन्ही रेल्वे स्थानकांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.