पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी
By कमलेश वानखेडे | Published: April 15, 2023 02:33 PM2023-04-15T14:33:27+5:302023-04-15T14:39:03+5:30
देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झालाय - पटोले
नागपूर : जम्मू काश्मिरचे चे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेबाबत स्पष्ट केलेली भूमिका भयावह आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून घातक आहे. राष्ट्रद्रोह आहे. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशाला उत्तर द्यावे, या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केली.
पटोले म्हणाले, ज्या पद्धतीने पुलवामा घटनेमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी देशासाठी संरक्षणासाठी निरपराध सैनिकांचा मृत्यू होणे आणि त्याचे राजकरण करून देशाची निवडणूक जिंकणे याचा प्रयत्न झाला आहे. या विश्वासघातकी व्यवस्थेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे. देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झाला आहे. भाजपचे संघटन महासचिव राम माधव यांनी जम्मू काश्मिरच्या सुरक्षेसाठी जे काही पैसे दिले जातात, त्या फाईलवर सही सही करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोटही मलिक यांनी केली आहे. यावरून सुरक्षेतही भाजप किती मोठा भ्रष्टाचार करीत आहे हे देखील स्पष्ट झाले आहे. या दोन्ही मुद्यांवर पंतप्रधान मोदी यांना उत्तर द्यावे लागेल, अशी मागणी पटोले यांनी केली.
सरकारवर देशद्रोहाचा खटला चालवा - राऊत
हा मोठा गौप्यस्फोट नाही, ही गोष्ट देशाला आधीच माहीत होते. त्यावेळचे सत्ताधारी यांना निवडणुका जिंकण्यासाठी काहितरी गडबड करतील हे माहीत होतं. हे प्रश्न आम्ही वारंवार विचारण्याचा प्रयत्न केला. १५० किलो आरडीएक्स त्याठिकाणी गेले, आरडीएक्स पोहचले कसे, पुलवामा रस्त्यावर जवान का पाठवले, त्यांच्यासाठी विमान का पाठवले नाही, की जवानांची हत्या व्हावी आणि निवडणुका जिंकायच्या असा आरोप केल्यावर आमच्यावर देशद्रोहाचा आरोप झाला. मात्र आज सत्यपाल मलिक यांनी थेट सत्य मांडले. या सरकारवर देशद्रोहाचा खटला चालविला पाहिजे, आणि जे दोषी आहे त्यांचे कोर्ट मार्शल व्हायला पाहिजे. राजकीय लाभ घेण्यासाठी या हत्येचा फायदा केला गेला, याची चौकशी व्हावी खा. संजय राऊत यांनी नागपुरात केली.