पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर करणार १० किमीचा प्रवास; असा असणार नागपूर दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2022 11:25 AM2022-12-09T11:25:15+5:302022-12-09T11:29:21+5:30
११ डिसेंबरला सकाळी ९.२५ वाजता विमानतळावर आगमन, दुपारी १२.५५ वाजता गोव्यासाठी रवाना होणार; दौऱ्याच्या वेळी शहराच्या सीमा 'सील'
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी नागपूर दौऱ्यावर येत असून यासाठी प्रशासनाकडून जोरात तयारी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान हे समृद्धी महामार्गावार सुमारे १० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे सकाळी ९.२५ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. या दौऱ्यात ते एम्सचे औपचारिक उद्घाटन करतील. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवी झेंडी दाखवतील. मेट्रो रेल्वेच्या फ्रीडम पार्कची पाहणी करतील. सोबतच मेट्रो रेल्वे मार्ग व समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करतील. त्यानंतर दुपारी १२.५५ वाजता विमानतळावरून वायुसेनेच्या विमानाने गोवा येथे रवाना होतील.
असा आहे पंतप्रधानांचा दौरा
- सकाळी ७.५० : दिल्लीहून रवाना
- सकाळी ९.२५ : नागपूर विमानतळावर आगमन
- सकाळी ९.४० : रस्ते मार्गाने रेल्वे स्थानकावर आगमन
- सकाळी ९.५५ : रेल्वे स्टेशनवरून प्रस्थान
- सकाळी १० : फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन येथे आगमन
- सकाळी १०.१० : मेट्रो प्रदर्शनीची पाहणी करून मेट्रो रेल्वेने प्रस्थान
- सकाळी १०.२० : खापरी मेट्रो स्टेशनवर आगमन व मेट्रोच्या दोन मार्गांचे लोकार्पण- सकाळी १०.३० : खापरी मेट्रो स्टेशनवरून रस्ते मार्गाने प्रस्थान
- सकाळी १०.४५ : समृृद्धी महामार्गाच्या एन्ट्री पॉईंटवर आगमन
- सकाळी १०.४५ ते ११.००: समृद्धी महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास व महामार्गाचे लोकार्पण
- सकाळी ११ : रस्ते मार्गाने प्रस्थान
- सकाळी ११.१५ : मिहान एम्स येथे आगमन व एम्सचे औपचारिक उद्घाटन
- सकाळी ११.२५ : रस्ते मार्गाने प्रस्थान
- सकाळी ११.३० : एम्सच्या टेम्पल ग्राउंडवर सार्वजनिक कार्यक्रम, नव्या प्रकल्पांचे येथेच भूमिपूजन
- दुपारी १२.३५ : विमानतळासाठी प्रस्थान
- दुपारी १२.५५ : गोव्यासाठी विमानाने प्रस्थान
( टीप : कार्यक्रमात अंतिम क्षणी फेरबदल होण्याची शक्यता आहे. )