न्युमोकोकल लस रोखणार बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:06 AM2021-07-11T04:06:50+5:302021-07-11T04:06:50+5:30
नागपूर : न्युमोनिआ असलेल्या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका राहत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत शून्य ते ...
नागपूर : न्युमोनिआ असलेल्या रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका राहत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेत शून्य ते १९ या वयोगटातील ३७ बालकांचा मृत्यू झाला आहे. तर, विविध आजारांमुळे २०२०-२१ या वर्षात शून्य ते एक या वयोगटातील ८८६ बालकांचा मृत्यूची नोंद आहे. या दोन्हीमध्ये न्युमोनिआचा रुग्णांची संख्या मोठीआहे. हे मृत्यू रोखण्यासाठी नागपूर जिल्ह्यात पुढील आठवड्यापासून बालकांना न्यूमोकोकल लस दिली जाणार आहे. यासाठी जिल्हा आरोग्य विभागाला २४०० डोस उपलब्ध झाले आहेत.
शून्य ते एक या वयोगटातील मृत्यूची संख्या मोठी आहे. या बालमृत्युमध्ये न्युमोनिआ हे सुद्धा एक कारण ठरले आहे. देशात दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक बालकांचा मृत्यू न्युमोकोकल या आजारामुळे होतो. दरम्यानच्या काळात ‘सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया’ने ‘न्यूमोकोकल पॉलीसॅकराइड कंज्युमेंट व्हॅक्सीन’ विकसित केली. याला नुकतेच ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मंजुरी दिली. जीवघेण न्युमोनियावर ही लस प्रभावी ठरत असल्याने बालमृत्यू रोखण्यासाठी न्युमोकोकल लसीकरण राबविण्यात येणार आहे. राज्यात हे लसीकरण १२ जुलैपासून सुरू होणार असल्याचे बोलले जात असलेतरी नागपूर जिल्ह्यासाठी निश्चित तारीख उपलब्ध झाली नाही.
-काय आहे न्युमोकोकल न्युमोनिया
न्युमोकोकल न्युमोनिया हा श्वसनमार्गाला होणारा एक संसर्ग आहे. ज्यामुळे फुप्फुसांवर सूज येऊन त्यात पाणी भरू शकते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. शरीरातील ऑक्सिजन कमी होऊ शकतो. बालकांना याचा धोका संभवतो.
- बालकांना दिले जाणार तीन डोस
बालकांना न्युमोकोकल लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत. बालक सहा आठवड्यांचे झाल्यानंतर पहिला डोस, १४ आठवड्यांनंतर दुसरा डोस तर, नऊ महिन्यांचे झाल्यानंतर तिसरा ‘बुस्टर’ डोस दिला जाणार आहे.
-ही आहेत लक्षणे
खोकला, धाप लागणे, श्वास घ्यायला त्रास होणे, ही या आजाराची लक्षणे आहेत. जर आजार गंभीर असेल, तर मुलांना खाण्या व पिण्याची अडचण येऊ शकते. तसेच फिट येऊ शकते. त्यामुळे ते बेशुद्धदेखील होऊ शकतात. लहान बालकांमध्ये संसर्गाचा धोका संभवतो.
-न्युमोकोकल लसीकरणासाठी २४०० डोस उपलब्ध
न्युमोकोकल आजाराचा संसर्ग बालकांना होऊ नये यासाठी न्युमोकोकल लस दिली जाणार आहे. या लसीचे तीन डोस बालकांना दिले जातील. लसीकरण सुरू करण्याची निश्चित तारीख मिळाली नाही. परंतु लवकरच लसीकरण सुरू होईल. यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या आपल्याकडे या लसीचे २४०० डोस उपलब्ध झाले आहेत.
-डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर
:: शून्य ते एक वर्षातील बालमृत्यू
२०१४-१५ : १७४
२०२०-२१ : ८८६
:: कोरोनामुळे शून्य ते १९ वयोगटांतील मृत्यू
(जानेवारी ते जून २१पर्यंत)
पुरुष : २१
स्त्री : १६