बदलत्या वातावरणाचा परिणाम; न्युमोनियाच्या रुग्णांत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2021 11:05 AM2021-11-16T11:05:43+5:302021-11-16T11:19:31+5:30
डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, न्युमोनियाचे सर्वाधिक रुग्ण आशियात दिसून येतात. यातील बहुसंख्य म्हणजे ४३ दशलक्ष रुग्ण भारतात आढळून येतात.
नागपूर : सहज प्रतिबंध आणि उपचार करण्याजोगा असूनही, न्युमोनिया हा लहान मुलांमधील आणि प्रौढांमधीलही मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. हा आजार सहसा लहान मुलांना होतो असे समजले जाते. पण हा प्रौढांनाही मोठ्या प्रमाणात होतो. न्युमोनियाला प्रतिबंध घालण्यासाठी आरोग्य विभागामाार्फत १२ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
न्यूमोनियाचे प्रकरण परस्परांपासून अनेकदा वेगळे असते आणि यामागे बरीच कारणे आहेत. आजाराला कारणीभूत घटकांनुसार त्या वेगळ्या ठरतात किंवा संसर्ग नेमका कुठून झाला यावरून त्या वेगळ्या ठरतात. याशिवाय न्युमोनियाचे अनेक प्रकार आहेत. तरीही दक्ष राहून, लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सध्या बदलत्या वातावरणामुळे न्युमोनियाचे रुग्ण वाढत आहेत. लवकर निदान व उपचाराने या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
न्युमोनियाचे भारतात ४३ दशलक्ष रुग्ण
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, न्युमोनियाचे सर्वाधिक रुग्ण आशियात दिसून येतात. यातील बहुसंख्य म्हणजे ४३ दशलक्ष रुग्ण भारतात आढळून येतात. दरवर्षी ६ लाख रुग्णांना न्युमोनियामुळे रुग्णालयात दाखल करावे लागते. यातील सुमारे २० टक्के रुग्ण दगावतात.
बालमृत्यूचेही प्रमाण मोठे
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यानुसार, भारतात दरवर्षी न्युमोनियामुळे मोठ्या प्रमाणात बालमृत्यू होतात. त्याचे प्रमाण २०२५ पर्यंत दर हजारी तीनपर्यंत कमी करावयाचे आहे. न्युमोनिया हा आजार फुफ़्फुसांना तीव्र स्वरुपात होणारा, तसेच नेहमी दिसून येणारा सर्वसामान्य संसर्ग आहे. हा संसर्ग बहुतांशी विषाणू किंवा जिवाणूमुळे होतो. संसर्ग झालेल्या बालकांना खोकला येणे, श्वास लागणे, छाती आत ओढणे, ताप येणे अशी लक्षणे असतात.
बालकांचे ठाराविक वयोगटात लसीकरण आवश्यक
बालकांमध्ये न्युमोनिया टाळण्यासाठी सहा महिने निव्वळ स्तनपान करावे. बाळाला पहिल्या सहा आठवड्यात पहिला, चौदा आठवड्यात दुसरा, बुस्टर डोस नवव्या महिन्यात द्यावा. न्युमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिन घेतले आहे काय, याची खात्री करावी. बाळाचे आरोग्य केंद्रात जाऊन संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, असा सल्लाही डॉ. सेलोकर यांनी दिला आहे.