उपराजधानीत धावणार पॉड टॅक्सी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:14 AM2017-09-16T01:14:10+5:302017-09-16T01:14:58+5:30
नागपूरसह देशातील गुरुग्राम आणि वाराणसी या दोन शहरात चालकरहित पॉड टॅक्सी चालविण्याची कवायत सुरू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरसह देशातील गुरुग्राम आणि वाराणसी या दोन शहरात चालकरहित पॉड टॅक्सी चालविण्याची कवायत सुरू झाली आहे. देशात या कारसाठी सुरक्षा मानके निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेतज्ज्ञांच्या समितीने या शहरांची निवड केली आहे. याकरिता सुरुवातीला प्रत्येक शहरात एक किलोमीटरचा परीक्षण मार्ग बनवावा लागेल.
एक कि.मी.वर पायलट पॅच : विशेतज्ज्ञांची समिती स्थापन
या शहरांमध्ये पॉड टॅक्सीच्या उपयोगाकरिता आधी रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम विकसित करण्याचे काम अमेरिकेची स्पेस एजन्सी नासाच्या स्कायट्रॉन आणि ब्रिटनची अल्ट्रा ग्लोबल पीआरटी करणार आहे. या कंपन्यांना आधी आपल्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता एक किलोमीटरमध्ये पॉड टॅक्सी वेचे प्रोटोटाईप बनवावे लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी न्यूझीलंडच्या मेट्रिनो पर्सनल रॅपिड ट्रान्सपोर्टसह अल्ट्रा ग्लोबल पीआरटी आणि स्कॉयट्रॉन पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी पुढे आली होती. आपल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारतीय कंपन्यांसोबत ‘जॉर्इंट व्हेंचर’ बनविण्याच्या उद्देशाने या कंपन्यांना सरकारकडून एक किलोमीटरचा
पायलट स्ट्रेच बनविण्यासाठी मंजुरी मिळाली होती.
भारतीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) हा प्रकल्प साकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एनएचएआयने गुरुग्रामकरिता निविदा मागविल्या आहेत. पण आता न्यूझीलंड येथील मेट्रिनोने प्रकल्पातून काढता पाय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
नीती आयोगाने या पॉड टॅक्सी प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखविताना निविदाकर्त्यांकडून प्रारंभी एक किलोमीटरचा पायलट स्ट्रेच बनवावा आणि त्यानंतरच प्रकल्पाचे काम देण्यात येईल, असे निर्देश भूपृष्ठ वाहतूक व राजमार्ग मंत्रालयाला दिले होते, असेही सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे वाहतूक विशेतज्ज्ञ, एनएचएआय आणि रेल्वेच्या अधिकाºयांचा समावेश असलेल्या एका अन्य उच्चाधिकारी समितीला पब्लिक रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टीमची मानके निश्चित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही समिती पुढील महिन्यात आपला अहवाल सरकारला सोपविण्याची शक्यता आहे.
बॉक्स
प्रकल्पाची माहिती नाही
पॉड टॅक्सीकरिता नागपूर शहराची निवड झाल्याची माहिती नागपूर कार्यालयाकडे नाही. या प्रकल्पाची माहिती मिळताच त्यावर काही बोलता येईल.
- एन.एल. येवतकर, प्रकल्प संचालक, एनएचएआय.
काय आहे पॉड टॅक्सी
पॉड टॅक्सी ४ ते ६ सिटचे स्वयंचलित वाहन आहे. सर्वसामान्यरीत्या हे वाहन दोन प्रकारचे असते. एक रुळावर तर दुसरे केबलच्या साहाय्याने हवेत चालते. हे वाहन चालकाऐवजी चार्जेबल बॅटरीवर चालते. या वाहनाचा शेअरिंग आॅटोप्रमाणे प्रयोग होऊ शकतो. यामध्ये एकाचवेळी पाचजण प्रवास करू शकतात. प्रवासी पॉडला भाड्यावरसुद्धा घेऊ शकतो. त्याची सरासरी गती प्रती तास ६० कि़मी. आहे. संभाव्य ठिकाणी पोहोचण्यासाठी टॅक्सीमधील टच स्क्रीनवर आपले ठिकाण टाईप करावे लागते. ठराविक स्टेशन येताच कार थांबते आणि दरवाजा आपोआप उघडतो. पॉड टॅक्सी रस्त्याच्या वर चालत असल्यामुळे प्रवासात प्रवाशाला रेड सिग्नल आणि वाहतुकीचा त्रास होत नाही. पॉड टॅक्सी प्रकल्पाची गुंतवणूक मेट्रो आणि मोनो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत फारच कमी असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.