कवी भाऊ पंचभाई यांचे निधन
By Admin | Published: January 22, 2016 03:23 AM2016-01-22T03:23:09+5:302016-01-22T03:23:09+5:30
‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली. इले बिलगता जीव, माहा होये
नागपूर : ‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली, मले फुलव म्हणाली, मले खुलव म्हणाली. इले बिलगता जीव, माहा होये कासावीस, तिले तिथं बी उपास, तिले इथं बी उपास...’ ‘हुंकार वादळाचे’ कविता संग्रहातील या काव्याने जनमानसात पोहोचलेले प्रसिद्ध कवी भाऊ ऊर्फ भाऊराव रामराव पंचभाई यांचे गुरुवारी पहाटे ४ वाजता नागपूर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. यांच्या निधनाबद्दल सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील पिंपळगाव या खेड्यात जन्मलेले भाऊ पंचभाई यांचे शालेय शिक्षण गावातच झाले. पुढे त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून एमए आणि त्यानंतर कायद्याचे शिक्षण घेतले. पुणे येथील फिल्म इन्स्टिट्यूट येथून चित्रपट निर्मात्याचे प्रशिक्षणही प्राप्त केले. काही काळ दूरदर्शनला निर्माता म्हणून काम पाहिले.
२००२ पासून त्यांनी उच्च आणि जिल्हा न्यायालयात वकिली सुरू केली. ते नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांचे वर्ग घेत होते. १३ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जात असताना पांढराबोढी, नागपूर येथे त्यांचा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले. एका खासगी इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू असताना ते कोमात गेले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले.
भाऊ पंचभाई यांनी आपला पहिला कविता संग्रह ‘हुंकार वादळाचे’ १९८९ मध्ये काढला. यातील ‘एक वाळलेली काडी, माझ्या अंगणात आली...’ या काव्याला गायक कलावंत अनिरुद्ध बनकर यांनी संगीतबद्ध करून आपल्या आवाजातून जनमानसात पोहचविले. या कविता संग्रहाला शासनाचा पुरस्कारही मिळाला. २००४ मध्ये त्यांचा दुसरा कविता संग्रह ‘निखाऱ्यांच्या रांगोळ्या’ प्रकाशित झाला. २०१४ मध्ये ‘अभंगाच्या ठिणग्या’ आणि ‘स्पंदन पिसारा’ हा संग्रहही प्रकाशित झाला. नुकत्याच त्यांचे ‘स्वप्नगंधा’ आणि ‘कुंदनबन’ हे दोन्ही कविता संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर होते. ‘जखमांचा अजिंठा’ हा त्यांचा ललित संग्रह आणि ‘आंबेडकरवादी साहित्य आणि समाजक्रांती’ हा वैचारिक निबंधही प्रकाशित झाला आहे. दूरदर्शनला निर्माता म्हणून असताना ‘तुफानातील दिवे’ या कार्यक्रमाला चांगली प्रसिद्ध मिळाली होती. यात प्रसिद्ध लोककवी व लोकशाहीर वामनदादा कर्डकपासून अनेकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. १९८३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे आयोजित सातव्या भारतीय दलित साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अखिल भारतीय दलित साहित्य संसदेचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.