मंदिर में दीप जले, उजाला मस्जिद में हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:46 AM2018-12-18T10:46:39+5:302018-12-18T10:51:22+5:30

लोकप्रिय युवा कवी डॉ. कुमार विश्वास व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कवी संमेलनात राजकीय पक्ष व नेत्यांना व्यंगाच्या फटकाऱ्यांनी रसिकांना लोटपोट केले, सोबतच प्रेमाच्या, राष्ट्रीययतेच्या व भावनेच्या शब्दांनी अंतर्मुखही केले.

Poetry by Kumar Bisvas | मंदिर में दीप जले, उजाला मस्जिद में हो...

मंदिर में दीप जले, उजाला मस्जिद में हो...

googlenewsNext
ठळक मुद्देकुमार विश्वास यांनी जिंकलेहास्य, व्यंग व अंतर्मुख करणाऱ्या काव्यरसात भिजले श्रोते

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कविता नितळ, निखळ आनंद देणारी, मनाला प्रसन्न करणारी सुंदर रचना. प्रेमात बुडली की भावनेत शिरणारी, प्रेम भरणारी असते, विरहाची वेदना सांगणारी असते. व्यंगाने भरली की हास्य रसाचे कारंजे उडविणारी असते आणि हसता हसता अंतर्मुख करून डोळ्यात पाणी भरणारीही असते. काव्याच्या या सर्व रंगाचा मनमुराद आनंद संत्रानगरीच्या श्रोत्यांना सोमवारी खासदार महोत्सवाच्या माध्यमातून मिळाला. लोकप्रिय युवा कवी डॉ. कुमार विश्वास व त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कवी संमेलनात राजकीय पक्ष व नेत्यांना व्यंगाच्या फटकाऱ्यांनी रसिकांना लोटपोट केले, सोबतच प्रेमाच्या, राष्ट्रीययतेच्या व भावनेच्या शब्दांनी अंतर्मुखही केले. पावसाच्या अवेळी आगमनाबाबत डॉ. विश्वास यांच्या ‘शायद मेरे गीत किसीने गाये है, तभी तो ये बेमौसम बादल आये है...’पासून सुरू झालेला हा सिलसिला हास्याचे धुमारे उडवीत ‘मंदिर मे एक दीप जले तो मस्जिद तक उजाला जाये...’ अशा अंतर्मुख करणाºया रसपूर्ण काव्यापर्यंत बरसत राहिला.
निमित्त होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवांतर्गत आयोजित ‘एक शाम कुमार विश्वास के नाम’ या काव्य संमेलनाचे. डॉ. विश्वास यांच्यासह कवयित्री ममता शर्मा, कवी सुदीप भोला, दिनेश बावरा व रमेश मुस्कान अशा तरुण कवींनी विविधांगी काव्यरसाचा पूर्ण आनंद श्रोत्यांना दिला.
तत्पूर्वी लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी कांचन गडकरी, ज्येष्ठ संपादक श्रीपाद अपराजित, माजी खासदार दत्ता मेघे, जनआक्रोशचे संयोजक रवींद्र कासखेडीकर, आमदार सुधाकर कोहळे, गिरीश व्यास, नागो गाणार, डॉ. राजीव पोतदार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, महोत्सव समितीचे प्रा. आमदार अनिल सोले व जयप्रकाश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ कवी मधुप पांडेय यांनी काव्य संमेलनाची प्रस्तावना मांडली.
डॉ. कुमार विश्वास यांनी संमेलनाची सूत्रे स्वीकारताच सर्व पक्षांवर जोरदार फटकारे हाणत राजकीय नेत्यांवर व्यंगातून प्रहार केले. अर्थातच नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुका, देशाची राजकीय परिस्थिती आणि २०१९ च्या निवडणुकांचे विषय यात होते. या व्यंगाला श्रोत्यांनी जोरदार टाळ्या आणि हास्याची प्रचंड दाद मिळाली. ‘कवी कुठल्याही राजकीय पक्षाचे नसतात. त्यांच्यात असलेल्या शब्दांच्या प्रतिभेने नेत्यांच्या चुकीच्या धोरणावर ते टीका करू शकतात’, असे सांगत ‘कविता ज्या दिवशी सत्तेचे गुणगाण करायला लागेल, त्या दिवशी सत्ता नष्ट होईल किंवा कविता संपेल’ असा संदेशही त्यांनी दिला. ‘दोनो तरफ लिखा हो भारत, सिक्का वही उछाला जाये...’ अशा शब्दात त्यांनी राष्ट्रीयतेचा गुणगौरव केला.
यानंतर सुदीप भोला यांनी महाआघाडीवर हास्यकाव्यातून कटाक्ष टाकला. ‘किसी ने आंख मारी संसद में युंही, तो सुप्रिम कोर्ट ने धारा ही हटवाई’ म्हणत ‘मुझे रावन ने भी जितना नही भटकाया, उतना राजनीती भटका रही है...’ असा भगवान राम यांची व्यथा मांडणारा कटाक्ष त्यांनी केला. गीतांच्या चालीवर गायलेले काव्यशब्दही श्रोत्यांना लोटपोट करणारे ठरले. ‘लालटेनवा बुझ गया रे मेरा हवा के झोंके से..., कल भाजपा का मेहबुबा से ब्रेक अप हो गया..., योगी टॉप लागेलू..., अखिलेश कहे राहुल से...’ अशा काव्यगीतातून बिहार, जम्मू, उत्तरप्रदेश अशा विविध राज्यातील राजकारणावर कटाक्ष टाकून हास्यरसाचे कारंजे उडविले. मात्र या हास्य भरतानाच ‘गौरय्या ने अब बागो मे आना छोड दिया, डर के मारे कलियो ने मुस्काना छोड दिया...’ या कवितेतून लहान मुलींसह स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारावर अंतर्मुख करणारी कविता सादर करीत श्रोत्यांच्या डोळ््यात पाणी आणले.
मूळचे उत्तरप्रदेशातील व मुंबईत राहणाऱ्या दिनेश बावरा यांनी मंचावर येताच जोरदार फटकेबाजी केली. अवेळी आलेल्या पावसावर ‘डिसेंबरचे नाव बदलून मे करून टाका’ असा कटाक्ष करीत हास्य भरले. सामाजिक, राजकीय आणि दैनंदिन जीवनावर व्यंग करीत त्यांनी श्रोत्यांची वाहवा मिळविली. मधुमेह आजारावर ‘मै चाहता हुं शुगर हो, पर शरीर मे नही लोगों के चेहरो पर और दिलो मे हो...’ या काव्यरसातून त्यांनी अतर्मुखही केले. ममता शर्मा यांनी काव्यातून प्रेमरस भरला. ‘सामने आप गर युं ही बैठे रहे, रात कैसी भी हो रात कट जायेगी...’ या कवितेतून प्रेमरसाची जादू रसिकांनी अनुभवली. पुढे आलेल्या कवी रमेश मुस्कान यांनीही आपल्या हास्यव्यंग व काव्यमय सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.

गडकरीजी का काम बोलता है
डॉ. कुमार विश्वास यांनी राजकीय पक्षांना धारेवर धरले तरी नितीन गडकरी यांच्या कामाचे भरभरून कौतुक केले. आजकाल नेता कुणाचे ऐकायला तयार नाहीत, मात्र गडकरी सर्वांना ऐकण्यास उत्सुक असतात कारण त्यांनी तसे काम केले आहे. देशात कुठेही गेले तरी शानदार हायवे आणि पुलांचे काम झालेले दिसते. ते कठोर मेहनत करणारे आहेत. ‘उनका काम बोलता है’, सांगत ते देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. ‘मैने अहमदाबाद में एक मुख्यमंत्री को पीएम होने की शुभेच्छा दी थी और वो हो गये. हमारावाला मेरी सुनता ही नही’, असे व्यंग करीत त्यांनी हास्य पेरले. यादरम्यान संमेलनात सहभागी प्रत्येक कवीने कविवर्य सुरेश भट सभागृहाच्या भव्यतेची भरभरून प्रशंसा केली.

Web Title: Poetry by Kumar Bisvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.