समाजभान जपणारी कविता
By Admin | Published: December 27, 2015 03:31 AM2015-12-27T03:31:25+5:302015-12-27T03:31:25+5:30
वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते.
सुधाकर गायधनी : प्रीतगंधा कवितासंग्रहाचे प्रकाशन
नागपूर : वाङ्मय ही संवाद कला आहे. त्यामुळेच दोन रसिकांचा संवाद हे देखील साहित्य ठरते. कवयित्री माला पारधी म्हणजे कवितेचे बीजसत्व असणारे व्यक्तिमत्त्व. त्यांच्या या कवितासंग्रहात प्रीतीचा गंध दरवळतो पण तरीही त्यांच्या कवितेने समाजभान सोडलेले नाही. त्यांच्या कविता भावकवितेशी नातेबद्ध आहे. त्यांच्या काही कविता गझल या आकृतीबंधांची आठवण करून देणाऱ्या आहेत, असे मत ज्येष्ठ कवी सुधाकर गायधनी यांनी व्यक्त केले.
कवयित्री माला पारधी यांच्या ‘प्रीतगंधा’ कवितासंग्रहाचे प्रकाशन हॉटेल रंगोली येथे सुधाकर गायधनी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि. स. जोग तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, ज्येष्ठ साहित्यिक श्यामकांत कुळकर्णी, कवयित्री डॉ. रेखा लांजेवार उपस्थित होत्या. गायधनी म्हणाले, हल्ली सर्वत्र कविता गवतासारखी पसरलेली असताना ‘प्रीतगंधा’ हे बहरलेले फुलझाड आहे. डॉ. वि. स. जोग यांनी सर्व वक्त्यांच्या वक्तव्याचा परामर्श घेत कवितासंग्रहातील सौंदर्यस्थळे आणि बलस्थाने मार्मिकपणे उलगडून दाखविली. श्यामकांत कुळकर्णी यांनी कवितासंग्रहातील कवितांचे रसग्रहण केले. शैलेंद्र लेंडे म्हणाले, कवी म्हणून स्वत:ला सिद्ध करणे हे कठीण काम आहे. त्यासाठी कवीचा अभ्यास आणि चिंतन असणे आवश्यक आहे. त्याशिवाय सिद्ध करता येत नाही. माला पारधी यांच्या कवितेतून सर्वच भाव प्रभावीपणे व्यक्त झाले आहे, असे मत व्यक्त केले. रेखा लांजेवार यांनी प्रेमकवितांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशली टालाटुले यांनी तर आभार प्राप्ती पारधी यांनी मानले. याप्रसंगी माला पारधी यांनी प्रास्ताविकातून कवितासंग्रहाची निर्मितीप्रक्रिया सांगितली. (प्रतिनिधी)