रोमॅन्टिक लव्हचे स्पिरिच्युअल लव्हमध्ये परिवर्तन करणारे काव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:38 AM2018-06-17T00:38:20+5:302018-06-17T00:38:31+5:30
सना यांच्या काव्यातून निसर्गाशी साधर्म्य साधून पती-पत्नीचे संबंध, सांसरिक व मानवी जीवनाची गुंतागुंत उलगडते. मानवी जीवन सुख-दु:खाने भरले असले तरी ते आनंदाने कसे जगता येईल, याची जाणीव त्यांनी काव्यातून विलक्षण पद्धतीने करून दिली आहे. बायबलमध्ये पती-पत्नीचे संबंध सांगताना रोमॅन्टिक लव्ह असा उल्लेख केला आहे. आयुष्य आनंदी करण्यासाठी रोमॅन्टिक लव्हचे नंतर स्पिरिच्युअल लव्ह(आध्यात्मिक प्रेम)मध्ये परिवर्तन करावे लागते. हा परिवर्तनाचा प्रवास सना यांच्या काव्यात आढळतो, अशी भावना ज्येष्ठ साहित्य अभ्यासक उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सना यांच्या काव्यातून निसर्गाशी साधर्म्य साधून पती-पत्नीचे संबंध, सांसरिक व मानवी जीवनाची गुंतागुंत उलगडते. मानवी जीवन सुख-दु:खाने भरले असले तरी ते आनंदाने कसे जगता येईल, याची जाणीव त्यांनी काव्यातून विलक्षण पद्धतीने करून दिली आहे. बायबलमध्ये पती-पत्नीचे संबंध सांगताना रोमॅन्टिक लव्ह असा उल्लेख केला आहे. आयुष्य आनंदी करण्यासाठी रोमॅन्टिक लव्हचे नंतर स्पिरिच्युअल लव्ह(आध्यात्मिक प्रेम)मध्ये परिवर्तन करावे लागते. हा परिवर्तनाचा प्रवास सना यांच्या काव्यात आढळतो, अशी भावना ज्येष्ठ साहित्य अभ्यासक उल्हास पवार यांनी व्यक्त केली.
कवयित्री सना पंडित यांच्या ‘समर्पण’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृहात आयोजित या प्रकाशन सोहळ्याच्या वेळी माजी महापौर कुंदाताई विजयकर, ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. रवींद्र शोभणे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, उद्वेली प्रकाशनचे विवेक मेहेत्रे तसेच काव्यसंग्रहाचे भाष्यकार म्हणून ज्येष्ठ संपादक शैलेश पांडे व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पद्व्युत्तर मराठी विभागाच्या प्रा. डॉ. मोना चिमोटे प्रामुख्याने उपस्थित होते. उल्हास पवार यांनी सना यांच्या दोन्ही काव्यसंग्रहाची भरभरून तारीफ केली. त्यांनी ‘स्वर्ग आणि नरकात अंतर काही सेकंद आहे...’ या कवितेचा उल्लेख करीत छंद, वृत्त सांभाळताना मुक्तकाव्य, चारोळी, शेर, दोहे अशा मराठी काव्य परंपरेतील सर्व प्रकार नकळतपणे आत्मसात केल्याचे ते म्हणाले. राज्याच्या भौतिक विकासासोबत सांस्कृतिक विकास होणे महत्त्वाचे आहे. जेथे सांस्कृतिक विकास होत नाही, ते राज्य मोठे होत नाही, या यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तव्याची आठवण करताना नव्या पिढीसाठी सना पंडित यांच्या रूपाने ग्रेस, सुरेश भट, शांता शेळके, शिरीष पै आदींचा श्रीमंत वारसा मिळाल्याचे गौरवोद््गार त्यांनी काढले.
डॉ. मोना चिमोटे यांनी सना यांच्या सोहळे, जीवलगा व परजीवी या तीन कवितांमधून काव्यसंग्रहातील भावभावनांचा उलगडा केला. जेंडर इक्वॅलिटीवर बोलणाºया सना फेमिनिस्टही आहेत. मात्र त्यांच्या कवितांमध्ये तो आक्रोश आणि तक्रार नाही. ‘वाजत गाजत आणि निनादत, अमृतधारा रसरस बरसत...’ म्हणणारी कवयित्री निसर्गाचे विलोभनीय वर्णन करताना मानवी नात्यांवर प्रेम करायला शिकविते.
वृक्षाला बिलगून राहणारी वेल जरी परजीवी असते तरी, ‘जरी परजीवी जीव ओवाळूनी भारी...’ या कवयित्री शब्दातून पुरुषी अहंकाराचा तिरस्कार करण्यापेक्षा प्रेमाने स्वीकारण्याचे आवाहन करते. त्यांनी मानवी नात्यातील भावबंध, मुक्तता, मुग्धता, बेचैनी, भारावलेपण अतिशय तरल व हळुवारपणे उलगडल्याचे डॉ. चिमोटे यांनी सांगितले. शैलेश पांडे यांनी कवितांमधून सना यांनी भावना आणि व्यवहार यांचे उत्तम संतुलन साधल्याची भावना व्यक्त केली. निसर्गातून प्रेम, वात्सल्य प्रवाहित करताना जीवनातील बहुतांशी स्पंदनांना साद घातली आहे. पती-पत्नीसह प्रत्येक नात्याचे आशयपूर्ण वर्णन करताना, ‘झाकलेला चंद्र आणि झाकलेल्या चांदण्या...’ असे त्यांचे शब्द त्यांच्या भावनाशील व्यक्तित्त्वाचे दर्शन करणारे असल्याचे पांडे म्हणाले.
विवेक मेहेत्रे यांनी प्रकाशक म्हणून आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी व संचालन वृशाली देशपांडे यांनी केले. समीर पंडित यांनी आभार व्यक्त केले.