पोहे, मुरमुरे महागले; किराणा आणि मसाल्याचे भावही चढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2023 08:37 PM2023-06-28T20:37:27+5:302023-06-28T20:37:50+5:30
Nagpur News हंगामात धानाचे भाव जास्त होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या तांदळाचे भाव वाढले; शिवाय निर्यातही वाढली आहे. तांदळाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या या गणितामुळे पोहे आणि मुरमुऱ्याचे भाव वाढले आहेत.
नागपूर : पोहे आणि मुरमुऱ्याचे भाव धानाच्या भावावर अवलंबून असतात. हंगामात धानाचे भाव जास्त होते. त्यामुळे सर्व प्रकारच्या तांदळाचे भाव वाढले; शिवाय निर्यातही वाढली आहे. तांदळाची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून असणाऱ्या या गणितामुळे पोहे आणि मुरमुऱ्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळे नास्त्याच्या भावात वाढ झाली आहे. भाव वाढतच असल्यामुळे नास्ता काय करायचा, असा प्रश्न आहे.
दिवाळीपर्यंत भाव वाढतच राहणार
पातळ आणि जाड पोह्याच्या दरात ६ ते ९ रुपये किलोची वाढ झाली आहे. जुलैमध्ये अधिकमास सुरू होईल, तेव्हा मागणी राहणार नाही. त्यानंतर सणांमध्ये मागणी वाढेल आणि भावही वाढतील. यंदा पाऊस लांबल्यामुळे पीक एक महिना उशिरा येईल. त्यामुळेही भाव वाढेल.
द्विगेश ठक्कर, संचालक, भरतकुमार ॲण्ड कंपनी.
धानाचे दर वाढल्यामुळे साधे मुरमुरे ३०० वरून ३४० रुपये (७ कि.), भेळ मुरमुरे ६०० वरून ६५० ते ६६० रुपये (१० कि.) आणि खारे मुरमुरे ३०० वरून ३३० (५ कि.) रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सणांच्या हंगामात भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
बबली जैन, संचालक, निरंजन ट्रेडर्स
बाहेरचा नास्ता महागणार
पोहे असो वा मुरमुरे सर्वच खाद्यपदार्थांसह किराणा माल आणि मसाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याचा फटका सर्वांनाच बसला आहे. सर्वच प्रकारच्या नास्त्याचे भाव वाढवावे लागतील. खाद्यतेलाचे दर कमी झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. दरवाढीने त्रस्त आहे.
शीतल यादव, हॉटेलचालक
दोन वर्षांपासून सर्वच वस्तूंचे भाव आकाशाला भिडले आहेत. त्यामुळे स्वयंपाकघराचे बजेट वाढले आहे. शिवाय सध्या भाज्यांच्या किमतीने त्यात भर टाकली आहे. त्या तुलनेत उत्पन्न वाढले नाही.
कांता मोटघरे, गृहिणी
पोहे आणि मुरमुऱ्यासह आवश्यक दैनंदिन मालाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. संसार सांभाळताना कसरत करावी लागते. दरवेळी वाढणाऱ्या किमतीची आम्हाला सवय झाली आहे. तक्रार कुठे करावी, हे कळत नाही.
मृणाल पंचभाई, गृहिणी