इतर राज्यांकडे बोट दाखवणे ही असंवेदनशीलताच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:09 AM2021-09-24T04:09:38+5:302021-09-24T04:09:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डोंबिवलीतील अत्याचाराच्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न परत ऐरणीवर आला आहे. ही घटना संतापजनक असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डोंबिवलीतील अत्याचाराच्या घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न परत ऐरणीवर आला आहे. ही घटना संतापजनक असून, सरकारने या घटनेच्या तपासासाठी तातडीने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात एखादी घटना घडली की, अन्य राज्यांकडे बोट दाखविणे किंवा विपरित प्रतिक्रिया देणे, ही पूर्णपणे असंवेदनशीलता आहे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गुरुवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
डोंबिवली हा तसा शांत भाग मानला जातो, त्यामुळे तेथे अशी घटना ही खरोखर चिंता वाढविणारी आहे. विशेष अधिवेशन बोलाविण्याच्या राज्यपालांच्या सूजनावजा निवेदनावर सरकारकडून ज्या पद्धतीने उत्तर देण्यात आले, ती पूर्णत: अपरिपक्वता आहे. राज्यपालांच्या पत्रांना उत्तरे देण्यात श्रम घालविण्यापेक्षा महिलांवरील वाढते अत्याचार कसे थांबविता येतील, यावर श्रम घालविले, तर ते अधिक हिताचे ठरेल, असे फडणवीस म्हणाले.
भाजप सौदेबाजी करत नाही
आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले मला भेटले व त्यांनी राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती केली आहे. यासंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीमध्ये आम्ही चर्चा करून त्यानंतर त्यांना कळवू, असे सांगितले आहे. मात्र बारा आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, असा विषय याठिकाणी नाही. भाजप अशा पद्धतीने सौदेबाजी करत नाही. बारा आमदारांचे निलंबन नियमबाह्य आहे आणि त्यासंदर्भात आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.