शासकीय निवासी शाळेतील ३२ विद्यार्थिनींना विषबाधा

By admin | Published: July 27, 2014 01:17 AM2014-07-27T01:17:24+5:302014-07-27T01:17:24+5:30

महागाव येथील शासकीय निवासी मुलींच्या शाळेतील ३२ विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना महागाव आणि सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Poisoning to 32 students of Government Residential School | शासकीय निवासी शाळेतील ३२ विद्यार्थिनींना विषबाधा

शासकीय निवासी शाळेतील ३२ विद्यार्थिनींना विषबाधा

Next

सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर : निवासी समाजकल्याण अधिकाऱ्यावर गुन्हा
महागाव/सवना (जि.यवतमाळ) : महागाव येथील शासकीय निवासी मुलींच्या शाळेतील ३२ विद्यार्थिनींना शनिवारी सकाळी विषबाधा झाल्याने त्यांना महागाव आणि सवना येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असून दूषित पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी निवासी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यासह शाळेच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
महागाव येथील सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मुलींची शासकीय निवासी शाळेत २०३ मुली येथे शिक्षण घेत आहेत. शनिवारी सकाळी ७ वाजता अनेक मुलींना मळमळ होऊ लागली. काहींना उलट्या सुरू झाल्या तर काहींचे पोट दुखत होते. हा प्रकार माहीत होताच मुलींना महागावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. एका पाठोपाठ एक ३२ मुलींना येथे दाखल करण्यात आले. त्यापैकी अत्यवस्थ असलेल्या १९ मुलींना सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. महागाव येथे १३ मुलींवर उपचार करून सुटी देण्यात आल्याची माहिती महागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्योती राठोड यांनी दिली.
सवना येथे उपचार सुरू असलेल्या विद्यार्थिनींमध्ये सावित्री प्रमोद मोरे, प्राची तुकाराम सिंगाडे, सृष्टी सुरेश वाघमारे, भाग्यश्री संजय वाघमारे, अश्विनी विजय खंदारे, अस्मिता समाधान खंदारे, मनीषा मंचक पवार, सविता रोहिदास जाधव, दुर्गा अशोक चंदनकर, मंगला रामकिसन खंदारे, आरती शिवाजी चंदनकर, उषा साहेबराव वाघमारे, तृष्णा अरुण स्थूल, साक्षी विठ्ठल नरवाडे, दीक्षा अशोक साबळे, वृषिगंधा रमेश पाईकराव, दीक्षा अंबादास कांबळे, संध्या संजय काळबांडे, कांचन संतोष खंडागळे यांचा समावेश आहे. सर्व मुली १२ ते १४ वयोगटातील आहेत. या ठिकाणी शिक्षिका सुजाता पाटे सोडून कुणीही उपस्थित नव्हते. मुख्याध्यापिका मंगला भोयर यवतमाळवरून सकाळी ११ वाजता सवना रुग्णालयात दाखल झाल्या. या विद्यार्थिनींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉ.निलेश उके यांनी सांगितले. दरम्यान, प्रभारी तहसीलदार सुशील पांडे, तलाठी ललित इंगोले यांनी शाळेत पाहणी केली. त्यावेळी मुलींनी पाणी बरोबर मिळत नसल्याची तक्रार केली. निवासी शाळेच्या अधीक्षिका गैरहजर असल्याने संपर्क होवू शकला नाही. परंतु त्यांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याची लेखी माहिती येथील तहसीलदारांना दिली असल्याचे पांडे यांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच पालक बाहेरगावावरून शाळेत दाखल झाले. (शहर प्रतिनिधी)
पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
विद्यार्थिनींना झालेल्या विषबाधाप्रकरणी आमणी बु. येथील पालक प्रमोद विठ्ठल मोरे यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून जिल्हा निवासी समाजकल्याण अधिकारी, शाळेच्या निवासी अधीक्षक शीतल तेलंगे, निवासी व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Poisoning to 32 students of Government Residential School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.