नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:20 AM2018-05-12T00:20:31+5:302018-05-12T00:20:52+5:30

लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.

Poisoning from the wedding dinner at Kondhali in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा

नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा

googlenewsNext
ठळक मुद्देवर-वधूंसह ३८ जणांवर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्नात जेवण केल्यानंतर काही वेळाने पाहुणे मंडळींपैकी ३८ जणांना हगवण व ओकारीचा त्रास जाणवायला लागला. त्यात नववधू व वराचाही समावेश आहे. या सर्वांवर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना सुटीही देण्यात आली. त्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला.
मासोद (ता. काटोल) येथील कृष्णाजी ढोबळे यांच्या मुलीचा विवाह सोहळा बुधवारी (दि. ९) कोंढाळी येथील एका मंगल कार्यालयात पार पडला. या सोहळ्याला मासोद येथील बहुतांश नागरिकांनी हजेरी लावली होती. शिवाय, त्यांनी लग्नात जेवणही केले होते. मात्र, यातील काहींना गुरुवारी (दि. १०) ओकारी व हगवणीचा त्रास जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे मासोद येथील आरोग्य उपकेंद्रात डॉ. वर्षा बोरकर यांनी उपचाराला सुरुवातही केली. शिवाय, कृष्णाजी अटलवार (७०, रा. मासोद) यांना कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती केले.
दुसरीकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील येरमल व चमू मासोद येथे दाखल झाली. शुक्रवार (दि. ११) दुपारपर्यंत मासोद येथील उपकेंद्रात १८ जणांवर उपचार करण्यात आल्याची तसेच विषबाधेचे एकूण ३८ रुग्ण आढळून आल्याची माहिती डॉ. येरमल यांनी दिली. गजानन धारपुरे (७०), मीराबाई चोपडे (५४), मंगला ढोले (३४) व अथर्व संजय धारपुरे (१२) सर्व रा. मासोद यांच्यावर मासोद येथे उपचार करण्यात आले.
माहिती मिळताच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शशांक व्यवहारे, वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. जयश्री वाळके, यू.आर. निकम यांनी शुक्रवारी मासोद उपकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. विषबाधेच्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर व स्थिर असल्याची माहिती डॉ. सुनील येरमल यांनी दिली.
पाण्याचे नमुने तपासणीला पाठविले
लग्नात पालकची दाळभाजी खाल्ल्याने विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय, पिण्यासाठी ट्रॅक्टरने प्लास्टिकच्या टाकीमध्ये पाणी आणले होते. त्यात बर्फ टाकण्यात आला होता. पाण्यातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पाण्याचे नमुने तसेच मासोद येथील नळयोजनेच्या पाण्याचे नमुने तपासणीला पठविले असल्याची माहिती डॉ. सुनील येरमल यांनी दिली. गावात शनिवारपासून (दि. १२) सर्वेक्षण केले जाणार असून, नागरिकांना ‘मेडीक्लोर’चे वाटप करण्यात येणार असल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.

Web Title: Poisoning from the wedding dinner at Kondhali in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.