खिचडीतून पुन्हा विषबाधा
By admin | Published: March 3, 2016 02:50 AM2016-03-03T02:50:06+5:302016-03-03T02:50:06+5:30
हिंगण्यातील खिचडीतून विषबाधा प्रकरण थंड होत नाही तोच उमरेड शहरातील स्थानिक जीवन विकास वनिता विद्यालयातील विद्यार्थिनींना बुधवारी विषबाधा झाली.
उमरेड : हिंगण्यातील खिचडीतून विषबाधा प्रकरण थंड होत नाही तोच उमरेड शहरातील स्थानिक जीवन विकास वनिता विद्यालयातील विद्यार्थिनींना बुधवारी विषबाधा झाली. दुपारी १२ वाजेपासून सुरू झालेली धावपळ रात्री वृत्त लिहिस्तोवर सुरू होती. सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुमारे १६० विद्यार्थिंनीना उमरेड ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. यापैकी सुमारे ६० विद्यार्थिनींना काही तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. यातील बहुतांश विद्यार्थिनींना सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुटी देण्यात आली. पाच विद्यार्थिनींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रिया पुरुषोत्तम धकाते, सेजल धनराज शिवरकर, शिवानी पडोळे, वैष्णवी चंद्रकांत पडोळे, ईला पुरुषोत्तम धकाते अशी विद्यार्थिनींची नावे आहेत. सर्वच विद्यार्थिनी इयत्ता पाचवी ते सातवीच्या असून, १० ते १३ वयोगटातील आहेत. या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची मेडिकल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
सीमा वैद्य या विद्यार्थिनीला पालकांनी खासगी दवाखान्यात भरती केल्याचे समजते. सर्व मुली सुखरूप असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. व्ही. तडस यांनी दिली.
सकाळपाळीच्या सत्रात इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंतच्या सुमारे ४०० विद्यार्थिंनी होत्या. नेहमीप्रमाणे खिचडी शिजविण्यात आली. विद्यार्थिनींनी ती खाल्ली. त्यानंतर ११.३० वाजता शाळेला सुटीही झाली. यादरम्यान कुणासही बाधा झाली नाही. दरम्यान, दुपारी १२ वाजता काही पालकांनी विद्यार्थिनींना दवाखान्यात नेले. काही मिनिटातच आणखी मुली रुग्णालयात येऊ लागल्या. तोपर्यंत कुणास कानोकान माहिती नव्हती. रुग्णांची संख्या वाढताच ग्रामीण रुग्णालय जागे झाले आणि काही वेळेनंतर औषधोपचारासाठी एकच धावपळ सुरू झाली. सुरुवातीला वैद्यकीय उपचारावरून ताणतणावाचेही वातावरण बघावयास मिळाले.
शिक्षकांचीही झोप उडाली
आपल्या शाळेतील विद्यार्थिनी रुग्णालयात भरती असल्याची माहिती शाळेतील शिक्षकांना मिळताच असंख्य शिक्षक रुग्णालयात पोहोचले. ज्या शाळेतील ही घटना होती, त्या शाळेव्यतिरिक्तही शिक्षकांनी या ठिकाणी हजेरी लावली. विद्यार्थिनींची विचारपूस केली. शाळेच्या मुख्याध्यापिका विभा भुसारी यांच्या दिमतीला शिक्षकांची फळी सायंकाळी उशिरापर्यंत होती. याबाबत विभा भुसारी यांना विचारणा केली असता, आम्ही सर्व वस्तू दर्जेदार वापरतो. विद्यार्थिनींना अधिक रुचकर काय देता येईल, असा अट्टाहास आमचा असतो. परंतु या घटनेमुळे आम्हीदेखील व्यथित झालो आहोत.
अपचनाचा प्रकार
नागपूर : खिचडीतून विषबाधा प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. व्ही. तडस यांना विचारणा केली असता, अपचनाचा त्रास झाल्याने ही समस्या उद्भवल्याचे ते म्हणाले. अधिक तिखट वापरामुळे वा अन्य काही कारणामुळे हा प्रकार झाला असावा, परंतु याबाबतचे रिपोर्ट आल्यानंतरच सारे काही माहीत होईल, असेही ते बोलले. विद्यार्थिनींना मळमळ, उलटीचा त्रास तसेच थोडाफार पोटदुखाचाही त्रास होत होता, अशी माहिती डॉ. ओ. टी. गुरलवार यांनी दिली.
डॉक्टर मोबाईलवर व्यस्त
दुपारी १२ वाजताच्या सुमारास काही विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. व्ही. तडस हे मोबाईलवर ‘गेम’ खेळत होते, असा आरोप काही नागरिकांनी केला. सुमारे तासभर तडस खुर्चीवरून उठलेच नाही. यामुळे नागरिक संतापले. वातावरण गरम झाल्यानंतर उपचारासाठी पळापळ सुरू झाली. यामध्ये मात्र डॉक्टरांची चमू आणि प्रशिक्षणार्थी परिचारिका या चमूने रुग्णांवर तातडीने औषधोपचार सुरू केले. तडस यांनी मोबाईलशी चाळे करण्याचा प्रकार मी केला नसल्याचे स्पष्ट केले. मला या प्रकरणाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून हवी होती, ती मागत होतो, असे उत्तर त्यांनी दिले. तर या उत्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनीही मान डोलवली.
यांनीही केली विचारणा
उमरेड ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थिनी भरती होत असल्याचे लक्षात येताच जीवन शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, माजी मंत्री डॉ. श्रा. गो. पराते, संस्थापक शिक्षक वा. डो. बाकडे, सहसचिव प्रशांत सपाटे, पालिकेचे उपाध्यक्ष गंगाधर रेवतकर, माजी उपाध्यक्ष सुधाकर खानोरकर, भाजपाचे शहराध्यक्ष डॉ. मुकेश मुदगल, नगरसेवक संजय जयस्वाल, धनंजय अग्निहोत्री, सुभाष कावटे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, विजय नगरनाईक, सुधाकर बोरकुटे, विशाल देशमुख, नामदेव लाडेकर आदींनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त होता.
आमदारांच्या कानपिचक्या
ग्रामीण रुग्णालयाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत आ. सुधीर पारवे यांनी डॉ. एस. व्ही. तडस यांना जाब विचारला. तुमच्याबाबत अनेकांचे मत योग्य नाही. मुख्यालयी राहत नाही. ग्रामीण रुग्णालयात वेळेवर पोहोचत नाही. रुग्णांशी सौजन्यपूर्ण वागणूक नसते, अशा शब्दात आ. पारवे यांनी कानपिचक्या दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, आनंद राऊत, डॉ. अरविंद गजभिये, संजय टेकाडे, किशोर रेवतकर, दिलीप सोनटक्के, दामोदर मुंधडा, प्रदीप चिंदमवार आदींचीही उपस्थिती होती.
गर्दीने घुसमट
शहरात सदर प्रकरणाबाबत विविध अफवा पसरल्या. यामुळे गावातील शेकडो नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. आपली पाल्य शाळेत होती. तिने खिचडी खाल्ली या चिंतेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
यामुळे असंख्य चिंताग्रस्त पालकांनी ग्रामीण रुग्णालय गाठले. परंतु अनेकजण केवळ बघ्याच्या भूमिकेतच असल्याने गर्दी अधिक वाढली. यामुळे वॉर्डातील रुग्णांची अधिकच घुसमट होत होती. पालकांनीही आपल्या पाल्यास काही होणार तर नाही ना, या भीतीने रुग्णालयात तपासणीसाठी आणले. ही संख्या अधिक दिसून येत होती.
शिक्षक संघटना करणार काय ?
शिक्षक संघटनांनी आतापावेतो विविध प्रश्न आणि समस्यांना हात टाकत बऱ्याचदा एल्गार पुकारला आहे. परंतु आता खिचडीतून विषबाधेचे प्रकार वाढत चालले आहेत. शिक्षकांनी शिक्षणाचे धडे गिरवायचे की, खिचडीतून निर्माण होणाऱ्या समस्येशी दोन हात करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शालेय विद्यार्थ्यांना खिचडी वितरण बंद करण्याचीही मागणी नागरिक करीत आहेत. याप्रकरणी शिक्षक संघटना कोणती भूमिका घेणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.