प्रदूषणाची विषारी मगरमिठी; रसायनमिश्रीत पाण्याचा कहर, अंगावर गाठी, कॅन्सरची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 07:00 AM2022-03-08T07:00:00+5:302022-03-08T07:00:07+5:30
Nagpur News भूगावच्या लॉयड्स किंवा उत्तम गलवा स्टील प्लान्टच्या विषारी धूर व रसायनामुळे जमिनी नापीक झाल्या, आजूबाजूचे जंगल काळवंडलेच. त्याशिवाय परिसरातील रहिवाशांच्या मागे आयुष्यभरासाठी नको नको त्या भयावह आजारांच्या भानगडी लागल्या त्या वेगळ्याच.
नरेश डोंगरे / कमल शर्मा
नागपूर : भूगावच्या लॉयड्स किंवा उत्तम गलवा स्टील प्लान्टच्या विषारी धूर व रसायनामुळे जमिनी नापीक झाल्या, आजूबाजूचे जंगल काळवंडलेच. त्याशिवाय परिसरातील रहिवाशांच्या मागे आयुष्यभरासाठी नको नको त्या भयावह आजारांच्या भानगडी लागल्या त्या वेगळ्याच. या प्रदूषणामुळे माणसे, तसेच जनावरांना होणाऱ्या आजाराचे कसलेही सर्वेक्षण नाही, त्यासाठी कंपनीला जाब विचारणारे कोणी नाही, सामूहिक उपचाराच्या सोयीसुविधा नाहीत.
सर्वसामान्यांच्या वेदनांची ना हाक, ना बोंब अशी अवस्था आहे. या कारखान्यातून निघणारे रसायनमिश्रीत दूषित पाणी पिण्याची वेळ लगतच्या बरबडी, भुगांव, चितोडा, सेलुकाटे, इंजापूर आदी गावातील ग्रामस्थांवर आली आहे. धुरामुळे होणारे हवेचे प्रदूषण व त्यामुळे होणारे श्वसनाचे आजार वेगळेच. रसायनयुक्त पाण्याचा पिण्यासाठी किंवा आंघोळीसाठीच काय शेतात ओलितासाठीही वापर धोकादायक बनला आहे. या भागात त्वचारोगाचे प्रमाण भयावह स्थितीत पाेचले आहे. अनेकांना पाठीत, काहींना कंबरेत, तर काहींना डोक्यात गाठी आल्या आहेत. एका शेतकऱ्याला तर चेंडूपेक्षाही मोठा मांसाचा गोळा कंबरेवर आला आहे. केस गळती, घशात खरखर, खवखव, किडनी स्टोन म्हणजे मूतखड्याचा आजार घरोघरी पसरला आहे. अशा दूषित पाण्यामुळे या भागात कर्करोगाचे रुग्ण खूप अधिक असतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु, त्यासंदर्भात कोणीही योग्य ते सर्वेक्षण केलेले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच स्थानिक प्रशासन याबाबतीत उदासीन आहे किंवा त्यांच्यावर कारखान्याकडून दबाव आहे, असा आरोप गावकरी करतात. मधल्या काळात रसायनमिश्रीत दूषित पाण्याबद्दल तक्रारींमध्ये वाढ झाल्यानंतर प्रदूषणाचा मूळ स्रोत थांबविण्याऐवजी पाण्याच्या एटीएमचा प्रयोग करण्यात आला. पण, त्याचे पैसे गावकऱ्यांना मोजावे लागतात. २० लीटर शुद्ध पाण्यासाठी वीस रुपये मोजावे लागतात.
जनावरे खंगली, पोट खपाटीला गेले
कारखान्यात वितळलेल्या लोहखनिजाचा गाळ सतत नाल्यात सोडला जात असल्याने या भागातील जमीन काळीठिक्कर पडली आहे. दगड की कोळसा असा प्रश्न पडतो. जमीन, दगडधोंडे यासाेबतच झाडेझुडुपे, पानेफुले, मोठमोठे वृक्षही काळे पडले आहेत. या कारखान्याच्या प्रदूषणाच्या महाभयंकर विळख्यात माणसांसोबत पशू-पक्षीही अडकले आहेत. परिसरात धष्टपुष्ट गाय, बैल अपवादानेच दिसतात. चारापाण्याची तशी अडचण नाही. तरीही अगदी गोठ्यात बांधलेली जनावरेही खंगली आहेत. त्यांची पोटे खपाटीला गेल्याचे दिसते. त्यांचे शेणही काळपट असल्याचे गोपालक, शेतकरी दाखवतात. पाळीव प्राण्यांप्रमाणेच जंगलातील पशुपक्ष्यांची स्थिती भयंकर आहे. हा भाग सुनसान वाटतो. पक्ष्यांचा किलबिलाटही तुलनेने कमीच ऐकू येतो.
वेदना सांगायच्या कुणाला व ऐकणार कोण?
भूगाव परिसरातील गावकऱ्यांशी बोलताना प्रदूषणाची विषारी मगरमिठी, माणसे व पाळीव प्राण्यांच्या मागे लागलेल्या आजारांचे अक्राळविक्राळ स्वरूप आदींबद्दल चर्चा केली असता त्यांनी व्यथा ऐकविल्या, की हे सारे सहन करण्याशिवाय पर्याय नाही. खासदार, आमदार, अन्य लोकप्रतिनिधी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, आरोग्य यंत्रणा, वॉटर सॅम्पल टेस्टिंग लॅबोरेटरी आदींची व्यवस्था आमच्या वेदना ऐकतच नाही. जे थोडेबहुत लढायचा प्रयत्न करतात, त्यांना साम - दाम - दंड - भेद या मार्गाने गप्प बसविले जाते. त्यांनाच दाद मिळत नाही तर बाकीच्या गरिबांची काय बिशाद, असा सवाल हतबल शेतकरी करतात.