यंदा पोळा भरणार नाही : जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:18 PM2020-08-12T23:18:27+5:302020-08-12T23:20:24+5:30
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तसे आदेश जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा नागपुरात मोठा पोळा आणि तान्हा पोळा भरणार नाही. या दोन्हींवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तसे आदेश जारी केले आहेत.
पोळा हा शेतकऱ्यांचा सण म्हणून ओळखला जातो. ग्रामीण भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यादरम्यान पोळ्याच्या ठिकाणी मोठी यात्रा, मेळा भरतो. मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नागपुरात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. येत्या १८ ऑगस्ट रोजी पोळा आहे तर १९ ऑगस्टला तान्हा पोळा आहे. हा सण सार्वजनिक रीत्या साजरा झाल्यास कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने मोठा पोळा व तान्हा पोळा सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास प्रतिबंध घातला आहे. हा सण वैयक्तिकरीत्या साजरा करता येईल. परंतु तो करीत असताना शारीरिक अंतर पाळावे, तोंडाला मास्क लावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यापुरता तसा आदेश जारी केला आहे. परंतु पोळा हा शहरातही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. शहरासाठी स्वतंत्र आदेश लवकरच जारी केला जाणार असल्याचे सांगितले जाते.