पोलिसांच्या लेखी फरार असलेले धवड आमदाराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 11:44 PM2019-10-26T23:44:06+5:302019-10-26T23:46:19+5:30
नवोदय बँकेत कोट्यवधींचा घोटाळा घडवून आणल्याच्या आरोपात पोलिसांच्या लेखी फरार असलेले बँकेचे अध्यक्ष अशोक धवड नवनिर्वाचित आमदाराचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवोदय बँकेत कोट्यवधींचा घोटाळा घडवून आणल्याच्या आरोपात पोलिसांच्या लेखी फरार असलेले बँकेचे अध्यक्ष अशोक धवड नवनिर्वाचित आमदाराचे अभिनंदन करताना सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपराजधानीत खळबळ निर्माण झाली आहे.
पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, धवड यांनी बँकेचे काही संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला हाताशी धरून पदाचा दुरुपयोग करीत आरोपी सचिन मित्तल आणि बालकिशन गांधी यांच्या ग्लॅडस्टोन समूहास, हिंगल समूहास, जोशी तसेच झाम समूहाला कर्जफेडीची क्षमता न तपासता कोट्यवधींचे कर्ज दिले होते. आरोपींनी तारण ठेवलेल्या मालमत्तेची पडताळणी न करता अनेक कर्जदारांना बँकेच्या एक्सपोजर लिमिटपेक्षा अधिक जास्त कर्ज मंजूर केले. त्यामुळे बँक बुडाली. नवोदय बँकेत ३८ कोटी ७५ लाखांचा घोटाळा झाल्याचे लेखा परीक्षणातून उघड झाल्यानंतर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे त्याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात आतापावेतो कुख्यात बिल्डर हेमंत झाम, त्याचा काका मुकेश झाम, मुकेशची पत्नी तसेच नातेवाईक यौवन गंभीर अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. तर, १७ आॅक्टोबरला बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर चट्टे यांनाही ईओडब्ल्यूच्या पथकाने अटक केली होती. बँकेचे अध्यक्ष धवड आणि अन्य काही आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत. आम्ही त्यांचा कसून शोध घेत असल्याचे पोलीस सांगत असतानाच, आज सायंकाळी ६.२० च्या सुमारास खुद्द अशोक धवडच फेसबुकवर सक्रिय झाले.
उत्तर नागपूरचे काँग्रेसचे नवनिर्वाचित आमदार नितीन राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करतानाचा फोटो खुद्द धवड यांनीच त्यांच्या फेसबुक वॉलवर अपलोड केला. या फोटोत त्यांच्यासोबत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार दीनानाथ पडोळे, नरेंद्र जिचकार आणि नितीन कुंभलकर दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
सायबर सेल सक्रिय, पोलिसांची धावपळ!
विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलिसांचे धवड यांच्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. मात्र, हा फोटो व्हायरल करून खुद्द धवड यांनीच पोलिसांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे पोलिसांचा सायबर सेल सायंकाळी अचानक सक्रिय झाला. त्यांचे लोकेशन शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ वाढल्याचे दिसत होते.
पोलिसांचे वेट अॅन्ड वॉच !
सर्वोच्च न्यायालयाने धवड यांना बँक घोटाळा प्रकरणात पोलिसांकडे आत्मसमर्पण करण्यासाठी २१ दिवसांचा अवधी दिला होता. त्याला आणखी चार दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे धवड समोर असूनही पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, अशी माहिती या प्रकरणात संबंधित सूत्रांकडे विचारणा केली असता पुढे आली. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनीही या माहितीला दुजोरा दिला आहे.