नराधमाच्या मुसक्या बांधण्यात पोलिसांना यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:44 PM2019-02-28T22:44:36+5:302019-02-28T22:45:09+5:30
निरागस बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. बंट्या ऊर्फ करण दीनदयाल डांगे (वय २०) असे या नराधमाचे नाव असून, तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या बंट्या त्याच्या बहीण-जावयाच्या घरी डिप्टी सिग्नलमध्ये राहतो. तो एका आरामशीनवर काम करतो. दरम्यान, अत्याचारग्रस्त बालिकांना मेयोत दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निरागस बालिकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या बांधण्यात अखेर पोलिसांनी यश मिळवले. बंट्या ऊर्फ करण दीनदयाल डांगे (वय २०) असे या नराधमाचे नाव असून, तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. रोजगाराच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या बंट्या त्याच्या बहीण-जावयाच्या घरी डिप्टी सिग्नलमध्ये राहतो. तो एका आरामशीनवर काम करतो. दरम्यान, अत्याचारग्रस्त बालिकांना मेयोत दाखल करण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बंट्या एका आरामशीनवर काम करतो. साप्ताहिक पगार घेतल्यानंतर मंगळवारी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान तो यथेच्छ दारू पिला. वस्तीतील एका लग्नसमारंभात बिनबुलाए मेहमान बनून तो भोजनस्थळी शिरला. तेथे त्याने जेवण केले आणि सायकलने पुढे निघाला. मंदिराजवळ दोन बालिका खेळत असल्याचे पाहून बंट्यातील नराधम जागा झाला. आई बोलवत आहे, असे सांगून त्याने चार वर्षांच्या चिमुकलीला कडेवर घेतले तसेच सहा वर्षांच्या चिमुकलीचे बोट पकडून तो रेल्वे लाईनजवळच्या झुडपात शिरला. एकांत पाहून बालिका घाबरल्या आणि रडू लागल्या. नराधम बंट्याने त्यांना चाकू दाखवून गप्प केले. तेथे या निरागस बालिकांवर अत्याचार करून पळून गेला. दरम्यान, रडणाऱ्या बालिका दिसल्यामुळे मजुरांनी त्यांना जवळ घेतले आणि त्यांच्या घरी पोहचवले. बालिकांची स्थिती पाहून त्यांच्या नातेवाईकांना धक्का बसला. त्यांना मेयोत दाखल करण्यात आले. परिसरात चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याचे वृत्त पसरताच संतापाची लाट उसळली. दरम्यान, लकडगंज ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविण्यात आली.
या प्रकरणाचे वृत्त वायुवेगाने शहरात पसरले. सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त होत असतानाच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. ते मुंबईत होते. मात्र, त्यांनी गुन्हे शाखेसह शहरातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना आरोपीचा तातडीने छडा लावून त्याच्या मुसक्या बांधण्याचे आदेश दिले. त्यानुसार, वेगवेगळी तपास पथके आरोपीचा शोध घेऊ लागली. आरोपीचा डोळा सुजला आहे, एवढीच एक टीप पोलिसांकडे होती. त्याआधारे पोलिसांनी २५ पेक्षा जास्त संशयितांची चौकशी केली. दुसरीकडे बंट्या बुधवारी सकाळपासूनच दारूच्या नशेत परिसरात फिरू लागला. रात्रीच्या वेळी तो सायकलसह एका गल्लीत पडला अन् तसाच पडून राहिला. त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.
त्यामुळे तो सुजला होता. मध्यरात्रीनंतर शोधाशोध करणाऱ्या पोलिसांच्या नजरेस बंट्या पडला. त्याच्या डोळ्याला असलेली जखम आणि सूज पाहून पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा आरोपी बंट्या मोठमोठ्याने रडू लागला. आपण पाप केल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला लकडगंज ठाण्यात नेले. पहाटे २.३० वाजता त्याला अटक करण्यात आली.
५० हजारांचा पुरस्कार
परिमंडळ-३ चे उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंजचे ठाणेदार भानुदास पिदूरकर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संतोष खांडेकर, सहायक निरीक्षक गोरख कुंभार, पीएसआय प्रफुल्ल गाडेकर, रवी राठोड, हवालदार भोजराज बांते, प्रकाश सिडाम, विजय हातकर, रमेश गोडे, तेजराम देवळे, अनिल अंबादे, अजय बैस, दीपक कारोकर, यशवंत डोंगरे, शिपाई हिरालाल राठोड, राम यादव, प्रशांत चचाणे, दीपक सोनटक्के, फिरोज पठाण, शिवराज पाटील, भूषण झाडे, वासुदेव जयपूरकर आदींनी ही कामगिरी बजावली. पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी या तपास पथकाचे कौतुक करून त्यांना ५० हजारांचा पुरस्कार जाहीर केला आहे.