नागपुरात वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 07:44 PM2018-09-28T19:44:44+5:302018-09-28T19:45:40+5:30

पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

Police action against sand smugglers in Nagpur | नागपुरात वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

नागपुरात वाळू तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

Next
ठळक मुद्देलाखोंची वाळू जप्त : तस्करांमध्ये खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांनी वाळू तस्करांवर धडक कारवाई करून लाखोंची रेती जप्त केली. शुक्रवारी सकाळपासून दिघोरी ते उमरेड मार्गावर पोलिसांनी चालविलेल्या या कारवाईमुळे वाळू तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून रेती चोरून आणायची. ती रात्रीच्या वेळी रस्त्याच्या बाजूला खाली करायची. त्यानंतर जशी मागणी आहे, त्याप्रमाणे दामदुप्पट भाव लावून ती विकायची, असा वाळू माफियांचा फंडा आहे. पोलीस, महसूल खाते आणि आरटीओतील काही जणांना हाताशी धरून शासनाला कोट्यवधींचा फटका देण्याची वाळू तस्करांची ही नेहमीची पद्धत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ओव्हरलोडचे काम सांभाळणाऱ्या आदिल नामक दलालाकडून तस्करांना कारवाई न करण्याची हमी मिळाल्याने वाळू तस्करांनी रेतीची चोरी-तस्करी जोरात सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी घाटावरून चोरून आणलेली लाखोंची रेती दिघोरी-उमरेड मार्गावर दुतर्फा साठवून ठेवलेली आहे. ही माहिती कळताच परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, शुक्रवारी पहाटे ५ वाजतापासून कारवाईचा धडाका लावण्यात आला. नंदनवन तसेच परिसरातील आऊटर रिंगरोडने जाणारे रेतीने भरलेले १० ते १५ ट्रक पोलिसांनी पकडले. त्यात लाखो रुपये किमतीची रेती आहे. केवळ ट्रकमध्येच नव्हे तर रस्त्याच्या दुतर्फा, शेतात बेवारस अवस्थेत साठवून ठेवलेली रेती कुणाची आहे, त्याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांना टेन्शन, आरटीओ, महसूल विभाग बिनधास्त !
शहरात जड वाहतूक करणाऱ्या वाहनांपासून अपघात होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. दुसरीकडे ओव्हरलोड वाहनांना तसेच वाळू तस्करी रोखण्याची जबाबदारी असणारी आरटीओ आणि महसूल विभागाची मंडळी या गैरप्रकाराकडे डोळेझाक करीत आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून आदिल आणि नितीन नामक दलाल कमालीचे सक्रिय झाले आहे. वाहनचालकांना त्यांनी चिरिमिरीच्या बदल्यात ओव्हरलोड वाहनांवर कारवाई होणार नाही, याची हमी दिल्याचीही चर्चा आहे. आरटीओच्या कथित दलालांकडून पाठबळ मिळाल्यामुळे वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात (ओव्हरलोड) वाहनातून रेती, राखड, कोळशाची तस्करी चालविल्याचीही चर्चा या कारवाईच्या निमित्ताने सुरू झाली आहे.

 

Web Title: Police action against sand smugglers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.