फार्महाऊस किचनमध्ये पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:55+5:302020-12-30T04:10:55+5:30
दारू पिताना आढळले ग्राहक - बजाजनगरात आठवड्यातील दुसरी कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : परवाना नसताना ग्राहक दारू पिताना ...
दारू पिताना आढळले ग्राहक - बजाजनगरात आठवड्यातील दुसरी कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परवाना नसताना ग्राहक दारू पिताना आढळल्याने काचीपुऱ्यातील फार्महाऊस किचनमध्ये बजाजनगर पोलिसांनी कारवाई केली. पाच दिवसांपूर्वी काचीपुऱ्यातीलच एका सावजीमध्ये अशाच प्रकारे पोलिसांनी एक कारवाई केली होती. त्यामुळे आठवड्याभरातील काचीपुऱ्यातील ही दुसरी कारवाई ठरली आहे.
काचीपुऱ्यात फार्महाऊस सावजी भोजनालय आहे. तेथे ग्राहकांना दारू दिली जाते, अशी माहिती मिळाल्याने २६ डिसेंबरच्या रात्री पोलिसांचे पथक धडकले. त्यांनी एका टेबलवर बाटली ठेवून दारू पिणाऱ्या ग्राहकांना रंगेहात पकडले. यावेळी भोजनालयाचे संचालक श्रीकांत शाक्य आणि गौरव मेंढे तेथे नसल्याने पोलिसांनी व्यवस्थापक वैभव मडावी (वय २८, न्यू रामदासपेठ) याला विचारपूस केली. भोजनालयात दारू पिण्याचा परवाना नसल्याचे सांगितल्यामुळे पोलिसांनी ती दारू जप्त करून मडावीविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. हे प्रकरण वरिष्ठांकडे गेले असता त्यांनी भोजनालयाच्या संचालकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे, २० डिसेंबरला अशाच प्रकारे काचीपुऱ्यातीलच सुजल सावजी भोजनालयात पोलिसांनी अशीच कारवाई केली होती. २२ डिसेंबरला पीवीके वाईन शॉपच्या मदतीने दारू तस्करी करणाऱ्या राजा मिश्राला पकडून पोलिसांनी १५ हजारांची दारू जप्त केली होती. यावेळी आरोपी मिश्रा आणि व्यवस्थापकाला अटक करण्याऐवजी सूचनापत्र देऊन पोलिसांनी सोडून दिले होते. हॉटेल आणि ढाब्यावर दारू पिण्यास मनाई असताना देखिल अनेक हॉटेल, ढाबे आणि भोजनालयात ग्राहकांना दारू पिण्यासाठी खास व्यवस्था करून दिली जाते. स्थानिक पोलिसांच्या मदतीमुळेच हा गोरखधंदा सुरू आहे.
---