कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 12:11 AM2020-09-09T00:11:21+5:302020-09-09T00:16:09+5:30
उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी आज एकाच दिवशी हलगर्जीपणे विना मास्क फिरणाऱ्या ३९०६ वाहन चालकांवर कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे तो रोखण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनी आज एकाच दिवशी हलगर्जीपणे विना मास्क फिरणाऱ्या ३९०६ वाहन चालकांवर कारवाई केली. उपराजधानीत कोरोनाची स्थिती भयावह झाली आहे. या संबंधाने शासन प्रशासनाकडून वारंवार खबरदारीच्या उपाययोजना करण्यासंबंधी नागरिकांना सुचविले जात आहे. मात्र अनेक नागरिक अजूनही हलगर्जीपणा दाखवत आहेत. त्यांच्यामुळेच कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पोलिसांनी आता अशा निष्काळजी नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर, उपराजधानीतील वाहतूक शाखा पोलीस तसेच सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून कारवाईची मोहीम सुरू केली. दिवसभरात पोलिसांनी शहरात विना मास्क फिरणाऱ्या ३९०६ वाहन चालक आणि नागरिकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून ऑन द स्पॉट १३ लाख, २१ हजार, ४८० रुपयांचा दंड वसूल केला. घराबाहेर निघाल्यानंतर मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. दंडात्मक कारवाईला नागरिक जुमानत नसेल तर पुढच्या काही दिवसात यापेक्षा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई पुढीलप्रमाणे; केसेस व दंड
पो.स्टे - १७८४ - ३,९६,०८०
वाहतूक - २१२२ - ९,२५,४००
एकूण - ३९०६ - १३,२१,४८०