पोलीसच देत आहेत पोलिसांची सुपारी

By admin | Published: July 18, 2016 02:31 AM2016-07-18T02:31:09+5:302016-07-18T02:31:09+5:30

शहर पोलीस दलातील आपसी मतभेद सध्या टोकाला पोहचले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्याला धडा शिकविण्याच्या प्रयत्नात

Police are giving the police supari | पोलीसच देत आहेत पोलिसांची सुपारी

पोलीसच देत आहेत पोलिसांची सुपारी

Next

धडा शिकविण्याचा प्रयत्न : विकेट घेण्यासाठी बोलबच्चनचा वापर
नरेश डोंगरे नागपूर
शहर पोलीस दलातील आपसी मतभेद सध्या टोकाला पोहचले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्याला धडा शिकविण्याच्या प्रयत्नात काही मंडळी दलालाच्या भूमिकेत वावरणाऱ्या ‘बोलबच्चनच्या’ माध्यमातून ‘सुपारी’ देऊन एकमेकांच्या प्रकरणांची माहिती बाहेर काढत आहेत. विरोधकाची विकेट घेण्याच्या उद्देशाने काही जण बनावट प्रकरणंही तयार करीत आहेत. सीताबर्डी पोलीस ठाण्याशी संबंधित ‘फॅब्रिकेटेड व्हिडीओ क्लीप’ च्या निमित्ताने हा धक्कादायक प्रकार पुढे आला. सोबतच उपराजधानीतील काही पोलीस ठाण्यातील प्रकरणांची जोरदार चर्चाही आता सुरू झाली आहे.
गुन्हेशाखेसह शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यात कमी जास्त प्रमाणात वर्षानुवर्षांपासून गटबाजी आहे. ती कशासाठी आहे, तेसुद्धा जगजाहीर आहे. ठाण्यांतर्गत चालणारे जुगार क्लब, मटका, बुकींचे अड्डे, अवैध दारूचे गुत्ते, उशिरा रात्रीपर्यंत चालणारे हॉटेल, अवैध प्रवासी वाहतूक, कोळसा, रॉकेल, वाळू तस्करी, वेश्याव्यवसाय आणि अशाच प्रकारच्या अन्य अवैध धंद्यातून पोलीस ठाण्यात मोठे हप्ते येतात. ते कुणी गोळा करायचे, तेसुद्धा ठरलेले असते. गोळा करणारा आणि त्याच्याशी सलगी असणारे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत निर्ढावलेपणाने वागतात. त्यांची ठाण्यात दादागिरी चालते.
रोज ठाण्यात येणाऱ्या प्रकरणाला कशी कलाटणी द्यायची आणि त्यातून कशी मालसुताई करायची, त्यातही ‘लाडकी’ मंडळी तरबेज असतात. प्रत्येक प्रकरणात त्यांचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे ठाण्यातील बहुतांश मंडळी दुखावलेली असतात.

सीताबर्डी गटबाजीत नंबर-१
सीताबर्डी पोलीस ठाणे गटबाजीत नंबर-१ वर आहे. दोन वर्षांपूर्वी परिमंडळ १ मध्ये आलेल्या आणि वरिष्ठांचा लाडका म्हणून ओळखला जाणाऱ्या एका एपीआयने केवळ सीताबर्डीच नव्हे तर अंबाझरी, सोनेगाव, प्रतापनगर, एमआयडीसी, वाडी अशा पाच पोलीस ठाण्यातील वातावरण बिघडवले. प्रामाणिक वरिष्ठांचे नाव बदनाम करून हप्तेखोरांना प्रोत्साहन देण्याची मजल गाठली. अधिकार नसताना वरिष्ठांचे नाव घेत मोठमोठ्या प्रकरणात हस्तक्षेप करून दोन वर्षात त्याने कोट्यवधीची माया गोळा केली. शिस्तीचे दल असल्यामुळे वरिष्ठांना कुणी विचारण्याची हिंमत दाखवत नाही, हे जाणूनच त्याने चाणाक्षपणे अनेक ‘गेम‘ केले.
बदली झाल्यानंतरही त्याची गेमबाजी सुरूच आहे. त्यासाठी तो बोलबच्चन टोळीचा वापर करून घेत आहे. कोणत्याच प्रकरणात स्वत:चे नाव पुढे येणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेतो. म्हणूनच मोबाईलवर संपर्क करण्याऐवजी तो आपल्या खास कर्मचाऱ्याच्या माध्यमातून माहितीचे थेट आदानप्रदान करतो. वरिष्ठांनी नव्या-जुन्या ठाणेदारांना बोलते केल्यास अनेक धक्कादायक बाबींचा भंडाफोड होऊ शकतो.
सीताबर्डीतील चार पोलिसांवर शेकलेल्या ९ हजारांच्या ‘पोहे प्रकरणातही‘ त्याने हस्तकामार्फत भूमिका वठविली. बोलबच्चन टोळीने त्यासाठी मोबाईलवरून स्वत:च एक क्लीप तयार करवून घेतली. त्यात कुणापासून कोण किती हप्ता गोळा करतो आणि कुणाला किती रक्कम जाते, त्याचे प्रदीर्घ संभाषण आहे.
शनिवारी ही क्लीप व्हायरल झाली. ही क्लीप बारकाईने ऐकली तर प्रश्न विचारणाऱ्याला कोणते उत्तर पाहिजे, त्याची त्याने प्रश्नातच तजवीज करून ठेवल्याचे लक्षात येते. अर्थात् ही क्लीप तयार करणाऱ्याचा उद्देश सहजपणे लक्षात येतो.

 

Web Title: Police are giving the police supari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.