पोलीस घेत आहेत पोलीस निरीक्षकाच्या मैत्रिणींचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:08 AM2021-05-08T04:08:00+5:302021-05-08T04:08:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उच्च न्यायालयाने अग्रीम जामीन याचिका फेटाळून तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर गिट्टीखदान पोलीस निलंबित पोलीस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च न्यायालयाने अग्रीम जामीन याचिका फेटाळून तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर गिट्टीखदान पोलीस निलंबित पोलीस निरीक्षक अरविंद भोलेचा शोध घेत आहेत. पोलीस आता भोलेच्या अन्य नातेवाईकांचाही शोध घेत असून, या शृंखलेत लुटारू वधूसह अन्य चर्चित नावे पुढे आल्याचे स्पष्ट होत आहे.
भोले याने २०१९ मध्ये पीडित विधवा महिलेशी फेसबुकद्वारे संपर्क साधला होता. त्यानंतर महिलेशी मैत्री स्थापन केली. त्यावेळी भोले नंदनवन ठाण्यात दुय्यम निरीक्षक होता. त्याने महिलेला विवाहाचे आश्वासन दिले आणि ८ नोव्हेंबर २०२० रोजी वर्धा येथील एका धार्मिक स्थळावर लग्नही केले. यावेळी काही पोलीस कर्मचारीही उपस्थित होते. त्यानंतर भोले त्या महिलेसह नंदनवन येथील एका फ्लॅटमध्ये राहत होते. दरम्यान, या महिलेचे आपत्तीजनक फोटो काढून पत्नीच्या उपचाराच्या नावावर पैशाची मागणी केली. शेतीही आपल्या नावावर करण्याचा दबाव टाकू लागला आणि महिलेचे दागिने घेऊन तो फरार झाला. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या निर्देशानुसार, १२ मार्च रोजी गिट्टीखदान पोलिसांनी बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
मात्र, गुन्हा दाखल केल्यावरही गिट्टीखदान पोलिसांनी भोलेच्या अटकेबाबत गांभीर्य दाखविले नाही. भोलेने सत्र न्यायालयात अग्रीम जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तेथे यश मिळाले नाही म्हणून त्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. ३० एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळली आणि पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विशेष म्हणजे, या घटनेलाही आता आठवडा उलटून गेला आहे. मात्र, भोले पोलिसांच्या हाती लागलेला नाही. आता गिट्टीखदान पोलीस भोलेचे अन्य महिलांसोबत असलेल्या संबंधांच्या दिशेने तपास करीत आहेत. भोलेची मैत्री लुटारू वधूसह पाच-सहा महिलांसोबत असल्याची बाब पोलिसांना कळली आहे. नंदनवन निवासी एका महिलेसोबत भोले याची मैत्री होती. मैत्री तुटल्यानंतर एनजीओ चालविणाऱ्या लुटारू वधूकडे महिलेने भोलेबाबत तक्रार केली होती. मात्र, लुटारू वधूने महिलेची मदत करण्याऐवजी भोलेसोबत मैत्री प्रस्थापित केली. याचमुळे भोलेला नंदनवन येथून कंट्रोल रूममध्ये पाठविण्यात आले होते.
-------------
बॉक्स :
शिक्षिकेनेही केली होती तक्रार
पुणे येथील एका शिक्षिकेलाही भोले याने फेसबुकच्या माध्यमातून फसविले होते. त्या शिक्षिकेने भोलेसंदर्भात नोव्हेंबर २०१९ मध्ये शहर पोलिसातील बड्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. शिक्षिकेची अवस्था बघून अधिकाऱ्याने भोले याला आपल्या कक्षात बोलावले होते. मात्र, अधिकाऱ्याकडे जाण्याऐवजी भोले याने शिक्षिकेला मनोरुग्णालयाजवळ भेटण्यास बोलावले होते. तेथे शिक्षिकेशी तडजोड करीत भेट म्हणून दिलेले दागिने परत घेतले होते. हेच दागिने नंतर त्याने दुसऱ्या महिलेला उपहार स्वरूपात दिले होते.
--------------
नाशिकमध्ये झाला होता बरखास्त
भोले शिपाई म्हणून नाशिक पोलीस सेवेत दाखल झाला होता. तेथे एका प्रकरणात नाव आल्याने त्याला पोलीस सेवेतून बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर २००३ मध्ये एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यावर त्याची नियुक्ती पीएसआय म्हणून नागपूर जीआरपीमध्ये करण्यात आली होती.
...............