पोलीस करत आहेत ज्येष्ठांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:08 AM2021-05-20T04:08:55+5:302021-05-20T04:08:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकाकी जगणाऱ्या वृद्धांच्या लसीकरणासाठी पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गुन्हे शाखेच्या भरोसा सेलच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाकी जगणाऱ्या वृद्धांच्या लसीकरणासाठी पोलिसांनी मदतीचा हात पुढे केला आहे. गुन्हे शाखेच्या भरोसा सेलच्या माध्यमातून वृद्धांना काटोल मार्गावरील पोलीस मुख्यालय येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे.
एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या शहरात मोठी आहे. मुले दुसऱ्या शहरात किंवा परदेशात असल्याने त्यांना मदत करणारे कोणी नाही. त्यामुळे, ते सहजतेने गुन्हेगारांना बळी पडतात. भरोसा सेलच्या माध्यमातून अशा ज्येष्ठ नागरिकांना वेळाेवेळी मदत करण्यात येत असते. कोरोना संक्रमणाचा प्रभाव वृद्ध आणि मुलांवर मोठ्या प्रमाणात पडला आहे. एकाकी जगणारे अनेक वृद्ध लसीकरण केंद्रापर्यंतही पोहोचू शकत नसल्याची स्थिती आहे. ही स्थिती बघता पोलिसांनी पुढाकार घेतला आहे.
भरोसा सेलकडे अशा ५७८५ वृद्ध नागरिकांची नोंद आहे. पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क साधला जाऊन लसीकरणाबाबत नोंद केली जात आहे. एकाकी किंवा आजारपणामुळे जे वृद्ध लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना पोलीस आपल्या वाहनाने पोलीस हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. यासाठी एपीआय रेखा संकपाळ यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथकाच्या चार चमू कार्यरत आहेत. ज्येष्ठांना ताटकळत बसावे लागू नये म्हणून पोलीस हॉस्पिटलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस भरोसा सेलकडे नोंदणी असलेल्या ज्येष्ठांसोबतच अन्य वृद्धांची मदत करण्यास पोलीस सज्ज असून, लसीकरणाचा लाभ जास्तीतजास्त वृद्धांना व्हावा, हा यामागचा हेतू असल्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी गजानन राजमाने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
.............