पाच हजाराची लाच घेताना पोलीस शिपायाला अटक
By admin | Published: March 20, 2015 02:27 AM2015-03-20T02:27:57+5:302015-03-20T02:27:57+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या शिपायाला पाच हजाराची लाच घेताना अटक केली आहे.
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या शिपायाला पाच हजाराची लाच घेताना अटक केली आहे. शिपायाने लाच स्वीकारण्यासाठी पानठेला चालकाचे सहकार्य घेतले होते. अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव पद्माकर धोंडीराम इंगळे असून, सहकारी पानठेला चालक शेख करीम शेख जब्बार आहे.
कामठी येथील राजा खान या ट्रान्सपोर्टरचे रेतीचे ट्रक एमआयडीसी परिसरात चालतात. शिपाई इंगळे याने खान यांच्या ट्रकला दोन ते तीन वेळा पकडले. प्रत्येकवेळी कारवाईच्या बदल्यात २००० रुपये घेत होता. इंगळेने कारवाईतून मुक्तीसाठी खानकडे पाच हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे खान यांनी त्याच्याविरुद्ध एसीबीमध्ये तक्रार केली. एसीबीच्या पथकाने त्याला पकडण्याची योजना आखली. त्यानुसार बुधवारी सकाळी १०.३० वाजता खान पैसे घेऊन ठाण्यात पोहचला. मात्र शिपाई इंगळे याने त्याला पैसे घेऊन एसआरपीएफ कॅम्प जवळ बोलाविले. एसआरपीएफ कॅम्प जवळील पानठेला चालक करीम शेख याला पैसे देण्यास सांगितले. खानने पानठेला चालकाला पैसे देऊन इंगळेला फोन केला. पाच मिनीटानंतर इंगळे पैसे घेण्यासाठी पोहचला. एसीबीने आधीच सापळा रचून ठेवला होता. पैसे घेताच त्याला अटक केली.
ही कारवाई अधीक्षक प्रकाश जाधव, उपअधीक्षक सी. व्ही. बहादुरे, संजय पुरंदरे, निरीक्षक बावनकर, हवलदार संजय ठाकूर, सुभाष तान्होलकर,चंद्रशेखर ढोक, मनीष कावळे, प्रभाकर बले, मिश्रा यांनी केली. (प्रतिनिधी)