नागपूर जिल्ह्यात लाचखोर सहायक फौजदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:18 AM2018-04-11T10:18:11+5:302018-04-11T10:18:22+5:30
अपघातप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपघातप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकास १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सावनेर पोलीस ठाण्यातील सहायक फौजदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी सकाळी १०.४५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
हुसेन खॉ पठाण असे अटक करण्यात आलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. फिर्यादी राजेश नत्थूजी देशभ्रतार (४६, रा. खापरखेडा, ता. सावनेर) हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. मार्च महिन्यात त्यांच्या मालकीच्या ट्रकने सावनेर शहरालगतच्या वाघोडा येथील विजेच्या खांबाला धडक दिली होती. या घटनेचा तपास हुसेन खॉ पठाण याच्याकडे होता. त्याने ट्रकमालक राजेश देशभ्रतार यांना फोन करून ट्रकचालकास अटक व ट्रक जप्तीची कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली होती.
हा ‘कॉल’ देशभ्रतार यांनी ‘रेकॉर्ड’ करून ठेवला होता. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली होती. सोबतच ‘कॉल रेकॉर्डिंग’ सादर केली होती.
या आधारे एसीबीच्या पथकाने २२ मार्च रोजी हुसेन खॉ पठाण याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. मात्र, त्याला या कारवाईची माहिती मिळाल्याने यात ‘एसीबी’च्या पथकाला यश आले नव्हते. त्यामुळे ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी सकाळी सावनेर पोलीस ठाणे गाठून हुसेन खॉ पठाण याला ताब्यात घ्ोत अटक केली आणि नागपूरला घेऊन गेले.