पोलिसांनो कडक व्हा,उपद्रवींना फिरणाऱ्यांना आवरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 10:58 PM2020-03-27T22:58:50+5:302020-03-27T23:00:54+5:30
रस्त्यावर फिरून उपद्रव करीत आहेत, अशा लोकांमुळे आतापर्यंत आटोक्यात असलेली परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा उपद्रवी लोकांविरुद्ध कठोर होण्याची वेळ आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून शासन-प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत. यासाठी लॉकडाऊन व कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. बहुतांश लोक याचे पालन करीत पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत आहे. परंतु काही जणांना अजूनही याचे गांभीर्य कळालेले नाही. ते गंमत म्हणून पाहत आहेत. रस्त्यावर फिरून उपद्रव करीत आहे. अशा लोकांमुळे आतापर्यंत आटोक्यात असलेली परिस्थिती बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अशा उपद्रवी लोकांविरुद्ध कठोर होण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधानांपासून तर मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि सर्व प्रशासकीय यंत्रणेद्वारा वारंवार नागरिकांना आपल्या घरी राहण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु काही लोक अजूनही ऐकायला तयार नाहीत. ते विनाकारण रस्त्यावर येत आहेत. गर्दी करीत आहे. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहने फिरत आहेत. प्रत्येक चौकात पोलीस आहेत. परंतु तेही हतबल दिसून येतात. काही जण मदतीच्या नावावर शहरभर फि रत असल्याचे प्रकारही होत आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. परंतु सामान्य नागरिक व खरच कामासाठी बाहेर पडलेल्यांना मात्र याचा फटका बसता कामा नये, इतकी काळजी निश्चित घ्यावी.
उपद्रवींना कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत लावा
वारंवार आवाहन करूनही काही लोक ऐकायलाच तयार नाही. ते विनाकारण रस्त्यावर येत आहेत. अशा लोकांविरुद्ध नागरिकांमध्येही प्रचंड चिड निर्माण होत आहे. अशा लोकांना पोलिसांनी पकडावे परंतु त्याना मारहाण न करता कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत लावावे. त्यांच्याकडून रक्तदान करवून घ्यावे, मोठा दंड आकारावा, अशा प्रकारचे मॅसेजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नागरिकांनीही विनाकारण गर्दी करू नये
अत्यावश्यक सेवा २४ तास सुरु आहेत. तेव्हा नागरिकांनीही विनाकारण दुकानांमध्ये गर्दी करू नये. कुटुंबातील सदस्यांना बाहेर जाण्यापासून रोखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहनांचे पासेस बंद व्हावे
अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत शहरात ९ हजारावर वाहनांना पासेस देण्यात आले आहे. त्यामुळे ही वाहने रस्त्यावर राहतीलच. रस्त्यावरील गर्दी आणखी वाढू नये म्हणून पास देणे आता बंद करण्यात यावे, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.