'गंगा-जमुना'त मौजमजा करायला गेले.. अन् दंडुके खाऊन आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2022 05:22 PM2022-06-01T17:22:45+5:302022-06-01T17:39:13+5:30
या घटनेनंतर समाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा नागपूर पोलीस मोठे आहेत का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सुरभी शिरपूरकर
नागपूर : नागपुरातील गंगा जमुना वस्ती, वस्ती जरी असली तरी इथं जे चालतं ते समाजाला मान्य नाही. वेश्यागमनाची वस्ती अशी तिची ओळख. त्यात पोलिसांची या भागावर करडी नजर. कोणी इथं आलं की त्याला पिटाळून लावण्यात पोलिस पुढाकार घेतात. हेच इथं होतं होतं. पोलिसांच्या धाकाला वारांगना कंटाळल्या होत्या. पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होत होता. जगायचं की मरायचं, जगायचं तर कसं जगायचं असा त्यांच्या पुढे प्रश्न गेल्या जवळजवळ १० महिन्यांपासून समोर येतोय.
त्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलास देणारा निकाल दिला. तो म्हणजे स्वेच्छेनं देहव्यापार करणं हा काही गुन्हा नाही. त्यामुळे या वारागनांना आशेचं किरण दिसलं. आत ग्राहक न घाबरता येतील.पोलीस त्रास देणार नाहीत असं त्यांना वाटत होतं. पण निकाल आला अन् दुसऱ्याच दिवशी पोलिसांची कारवाई झाली. काही तरुण या वस्तीत आले. पण त्यांना पोलिसांनी गाठलं, नुसतं गाठलं नाही तर त्यांना लाठ्यांचा प्रसादही दिला.
यात स्पष्टपणे पोलीस ग्राहकांना घेवून जाताना दिसत आहेत. त्यांना दंडूक्यांनी मारत आहेत. या घटनेनंतर समाजिक कार्यकर्त्या ज्वाला धोटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं देहविक्री हा व्यवसाय असून या व्यवसायातील महिलांना सन्मान आणि कायद्यानं पुरवलेल्या सुरक्षेचा समान अधिकार असल्याचे निरीक्षण दिलं होतं. सोबतच देहविक्री करणाऱ्यांना संवेदनशीलतेनं वागण्याचं आवाहन सर्वोच्च न्यायालयानं पोलीस यंत्रणेला केलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे हे आदेश नागपुरातील पोलीस विभागापर्यंत कितपत पोहोचले की पोहोचलेच नाही असा प्रश्न समोर येतोय. सर्वोच्च न्यायालयापेक्षा नागपूर पोलीस मोठे आहेत का असा प्रश्न धोटे यांनी उपस्थित केलाय.