गर्भवती गतिमंद महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:12 AM2021-09-17T04:12:35+5:302021-09-17T04:12:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नऊ महिन्यांचा गर्भ पोटात घेऊन ती रात्री घराबाहेर पडली. गतिमंद असल्याने रात्रभर इकडे तिकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नऊ महिन्यांचा गर्भ पोटात घेऊन ती रात्री घराबाहेर पडली. गतिमंद असल्याने रात्रभर इकडे तिकडे भटकत राहिली अन् गुरुवारी भल्या सकाळी गंगाजमुना सिमेंट मार्गावर बसून प्रसूतीपूर्व वेदनांमुळे ओरडू लागली. बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांनी लगेच तिला मदतीचा हात दिला अन् तत्काळ मेयो रुग्णालयात पोहोचविले. काही वेळेतच तिची प्रसूती झाली अन् ती तसेच तिचे बाळ आता सुखरूप आहे.
एखाद्या टीव्ही सिरियलमधील वाटावी अशी ही रियल स्टोरी गुरुवारी लकगडंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. उमा ही काहीसी गतिमंद असलेली महिला लालगंज झाडे चाैकातील आईच्या घरी राहते. बुधवारी रात्री घरच्या मंडळींची नजर चुकवून ती बाहेर पडली अन् वेड्यासारखी रात्रभर इकडे तिकडे भटकू लागली. इकडे तिचे नातेवाईक तिला या-त्या नातेवाइकांकडे शोधू लागले. मात्र, ती काही मिळेना. उमा गुरुवारी सकाळी सहाला गंगाजमुना सिमेंट मार्गावर पोहोचली. तेथे ती जोरजोराने पोट धरून रडत होती. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या नजरेस ती पडताच पोलिसांनी तिला आपल्या वाहनातून लगेच मेयोत नेले. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर लगेच उपचार सुरू केले अन् उमाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. देवदूत म्हणून मदतीला आलेल्या पोलिसांमुळे उमा अन् तिचे बाळ चांगले आहे.
----
कुटुंबीयांचाही लावला छडा
उमाला रुग्णालयात पोहोचविल्यानंतर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांनाही शोधून काढले आणि तिची आई मीरा धकाते यांना त्या आजी झाल्याची गोड बातमी दिली. रात्रभर गतिमंद गर्भवती मुलीचा शोध घेण्यासाठी पायपीट करणाऱ्या मीरा धकाते आणि त्यांच्या नातेवाइकांना ते ऐकून आनंदाश्रू रोखणे कठीण झाले होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहआयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त लोहित मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी संजय थोरबोले, ठाणेदार पराग पोटे, एपीआय विशाल माने, गोपिका कोडापे, हवालदार अरुण युवराज, शिपाई स्वाती, मधू, रेशमा सोनू, योगिता, पल्लवी, शुभांगी आणि सरिता यांनी ही प्रशंसनीय कामगिरी बजावली.
---