नागपुरात पोलिसांचा दावा फोल; आॅटोचालकांची मनमानी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:13 AM2018-04-19T00:13:51+5:302018-04-19T00:14:01+5:30
आॅटोतून प्रवास करणारा नागरिक चालकांच्या मनमानीला बळी पडू नये, यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. चौकातील रहदारी सुरळीत व्हावी, यासाठी चौकातील आॅटो पार्किंगवर नजर ठेवली जात आहे, असा दावा वाहतूक पोलिसांकडून केला जातो. याची माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’चमूने शहरातील विविध चौकात पाहणी केली असता, पोलिसांचा दावा फोल असल्याचे निदर्शनास आले. उलट आॅटोचालकांची मनमानी आधीपेक्षा अधिक वाढलेली असल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील आॅटोचालकांच्या मनमानीला आळा घातल्याचा दावा शहर वाहतूक पोलिसांकडून केला जातो. एवढेच नव्हे तर शहरातील आॅटो मीटरनुसार चालविले जावेत यासाठी प्रभावी उपाययोजना केलेल्या आहेत. वेळोवेळी आॅॅटोचालकांच्या विरोधात कारवाई केली जाते.
वाहतूक पोलिसांचा वचक नसल्याने आॅटोचालकांची मनमानी सुरू आहे. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक सुरू आहे. मीटरने भाडे घेण्याऐवजी मनमानी भाडे वसूल केले जाते. हा प्रकार एक-दोन चौकात नसून शहरातील सर्वच भागात हा प्रकार सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करूनही आॅटोचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई केली जात नाही.
आॅटोचालकांच्या विरोधात नागरिक पोलिसात तक्रार दाखल करतात. परंतु त्यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. वाहतूक पोलीस आॅटोचालकांच्या विरोधात कारवाई का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या उदासीनतेमुळे प्रवासीच नव्हे तर वाहनचालकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मनात येईल तेथे आॅटो उभे केले जातात. व्हेरायटी चौक, झाशी राणी चौक, महाराजबाग रोड, गणेशपेठ बसस्थानक, मेडिकल कॉलेज, अजनी रेल्वे स्टेशनसह शहराच्या सर्वच भागात हा प्रकार सुरू आहे.
सीसीटीव्ही काय कामाचे?
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, सोबतच सुरक्षा व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख चौक व मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यानंतरही आॅटोचालकांची मनमानी सुरू आहे. यामुळे पोलिसांनी चौकात व प्रमुख मार्गावर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे काय कामाचे हा नुसता देखावा तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्दळीच्या भागात अपघाताचा धोका
नागपूर शहरातील ठिकठिकाणी विकास कामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे, उड्डाण पुलांची कामे सुरू आहेत. यामुळे रस्ते अरुंद झाले आहे. अपघात होऊ नये यासाठी वाहनचालक काळजीपूर्वक वाहने चालवितात. मात्र वाहतूक पोलीस असूनही आॅटो भरधाव वेगाने चालविले जातात. वर्दळीच्या भागातही आॅटो भरधाव धावतात. यामुळे वाहनधारकांना त्रास होतो.
पोलीस स्टेशन बनले पार्किगस्थळ
वर्दळीच्या सीताबर्डी पोलीस स्टेशन परिसरात आॅटो उभे राहतात. आॅटो चालकांसाठी हे एक पार्किंग स्थळ बनले आहे. या मार्गावर बर्डी ते कामठी जाणाऱ्या वाहनांची वर्दळ असते. असे असूनही पोलीस स्टेशनपुढे आॅटो उभे राहतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परंतु सीताबर्डी पोलीस आॅटो चालकांवर कोणतीही कारवाई करीत नाही. अशीच परिस्थिती अमरावती मार्गावर आहे. व्हेरायटी चौक ते महाराज बाग मार्गावर, झाशी राणी चौक, मध्यवर्ती बस स्थानक आदी ठिकाणी आॅटोमुळे वाहतुकीची कोंडी होते.