पोलीस आयुक्तांनी चूक मान्य केली

By admin | Published: January 30, 2017 10:17 PM2017-01-30T22:17:29+5:302017-01-30T22:17:29+5:30

जनरल डायरची पदवी प्रदान : उपायुक्तांनी स्वीकारला सन्मान : नाट्यमय घडामोडींवर पडदा

Police Commissioner accepted the mistake | पोलीस आयुक्तांनी चूक मान्य केली

पोलीस आयुक्तांनी चूक मान्य केली

Next

जनरल डायरची पदवी प्रदान : उपायुक्तांनी स्वीकारला सन्मान : नाट्यमय घडामोडींवर पडदा
नागपूर : हे राम, नथुराम ! नाटकाचा निषेध नोंदवून आंदोलकांना गोळी घालण्याची धमकी देणारे फलक दाखविल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस आयुक्त सोमवारी अखेर नमले. तब्बल अडीच तास काँग्रेस नेत्यांना ताटकळत ठेवल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आयुक्तालयात आले. त्यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करताना वादग्रस्त फलकाबाबत चूक झाल्याचे मान्य केले आणि भविष्यात पुन्हा असा प्रकार घडणार नाही, त्याची काळजी घेतली जाईल, अशी हमी दिली. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यासाठी आणलेली जनरल डायरची पदवी, शाल आणि श्रीफळ पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी यांना दिले आणि या वादावर पडदा पडला. यानंतर पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस आयुक्तांचे वर्तन निषेधार्ह असून आपण त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांवर कारवाई केली नाही तर विधिमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, अशी महिती पत्रकारांना दिली.
२२ जानेवारीला देशपांडे सभागृहासमोर हे राम नथुराम या वादग्रस्त नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आंदोलन करून विरोध दर्शविला. पोलिसांनी या आंदोलकांना एक फलक दाखवला.
ह्यसुनो बलवाँईयो आप का जमाव गैरकानुनी है। आप लोग यहाँसे चले जाव। नही तो आप पर पक्की गोली चलाई जायेंगी। चले जाव। चले जाव। चले जाव।ह्णअसे त्यात नमूद होते.
लोकमतने त्या फलकासंबंधाचे सचित्र वृत्त प्रकाशित केले. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरातून या फलकाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस नेत्यांनी त्याचा निषेध नोंदवून पोलीस आयुक्तांना जनरल डायर पदवी देण्याचे घोषित केले. त्यानुसार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल कोटेचा यांच्यासह अनेक कार्यकर्ते सोमवारी सायंकाळी ५ वाजता पोलीस आयुक्तालयात पोहचले. रस्ता सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुक्त बाहेर गेले होते.
रस्ता सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुक्त बाहेर गेले होते. त्यांनी कार्यालयात यावे म्हणून काँग्रेस नेते तब्बल अडीच तास प्रभारी सहआयक्त रंजनकुमार शर्मा यांच्या कक्षात बसले. या कालावधीत सहआयुक्त शर्मा आणि उपायुक्त (विशेष शाखा) रवींद्रसिंग परदेसी त्यांना आयुक्तांच्या वतीने आम्ही ही पदवी घेतो, अशी वारंवार विनंती करीत होते. मात्र, जोपर्यंत पोलीस आयुक्त डॉॉ. व्यंकटेशम आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती. तब्बल अडीच तासानंतर काँग्रेस नेत्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. आम्ही पोलीस आयुक्तांचा पूर्ण सन्मान करू, त्यांना ही पदवी देणार नाही. त्यांच्या वतीने दुसऱ्या पोलीस अधिका-यांना जनरल डायरची पदवी देऊ, असे पत्रकारांपुढे घोषित केले. मात्र, पोलीस आयुक्त चर्चेला आल्याशिवाय कार्यालयातून हलणार नाही, या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे अखेर रात्री ७.२० वाजता डॉ. व्यंकटेशम आयुक्तालयात आले. त्यांनी सहआयुक्तांच्या कार्यालयात बसून असलेल्या काँग्रेस नेत्यांना आपल्या कक्षात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, विखे पाटील यांनी अडीच तासापासून येथे बसून आहोत, त्यामुळे आता येथेच आयुक्तांशी चर्चा करू, असे सांगितले. त्यानंतर आयुक्त सहआयुक्तांच्या कार्यालयात आले. त्यांनी सर्वप्रथम आपल्याला यायला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर विखे पाटील यांनी वादग्रस्त फलक आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत चर्चा केली. तुम्ही (पोलिसांनी) त्याचवेळी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. असे झाले असते तर पुढचा प्रकारच घडला नसला असता, असेही लक्षात आणून दिले. ज्या नथुरामने गांधीजींची हत्या केली, त्या नथुरामचे गोडवे गाणाऱ्या प्रवृत्तीला संरक्षण दिले जाते. गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना मात्र गोळी घालण्याची धमकी दिली जाते, हा काय प्रकार आहे असा सवालही त्यांनी केला. नोटाबंदीबाबत आंदोलन करणाऱ्यांवरही पोलिसांनी अमानुष लाठ्या चालवल्या होत्या. हा प्रकार निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले. गांधींची बदनामी करणाऱ्यांना संरक्षण देण्याचा हा मुद्दा राष्ट्रीय स्वरुपाचा आहे. त्यामुळे तुम्ही यापुढे असे काही घडणार नाही, याची काळजी घ्या, अशी सूचनाही विखे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना केली.
-
माजी केंद्रीय मंत्री मुत्तेमवार यांनीही जनरल डायरनंतर पहिल्यांदाच असा प्रकार घडल्याचे सांगून त्याचा निषेध नोंदवला. तुमच्या सारख्या मितभाषी पोलीस आयुक्तांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला, त्याचे फारच वाईट वाटत असल्याचे म्हटले. त्यावर बोलताना आयुक्त यांनी फलकाबाबतची चूक मान्य केली. आपण सनदशिर मार्गाने चालणारांचा नेहमी आदर करतो. आम्ही लोकांच्या संरक्षणासाठीच आहोत. कुणाला गोळी घालण्याा प्रश्नच नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आपण सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे. तुम्ही केलेल्या सूचनांचा आपण आदर करू, असे म्हणत त्यांनी या प्रकरणात खेद व्यक्त केला.
---
यानंतर विखे पाटील यांनी आयुक्तालय प्रतिक्षालयात पत्रकार परिषद घेतली. आपल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात पहिल्यांदाच असा प्रकार पाहिला. जालियानवाला बाग हत्याकांडाच्या वेळी जनरल डायरने जी क्रूर मानसिकता दाखवली. तशीच मानसिकता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहनगरात घडलेल्या या प्रकरणात दिसली. त्यामुळे आयुक्तांनी आणि गृहखाते सांभाळणा-या मुख्यमंत्र्यांनी जनतेची माफी मागायला हवी होती. मात्र, त्यांनी ती मागितली नाही. त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी पोलीस आयुक्तांना काँग्रेसतर्फे जनरल डायर पदवी देण्याचे जाहिर करण्यात आले होते, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. याबाबत आपण दोन दिवसांपूर्वी आयुक्तांना फॅक्स पाठवून माहिती दिली होती. तरीसुद्धा त्यांनी विरोधी पक्ष नेत्यासारख्या पदावरील व्यक्तींना तब्बल अडीच तास ताटकळत ठेवले. त्यानंतर ते आले आणि त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यांनी आधीच माफी मागितली असती तर हे प्रकरण पुढे गेलेच नसते, असेही त्यांनी सांगितले.
---
तक्रार अन् तिळगुळ
काँग्रेसनेते सहपोलीस आयुक्तांच्या कक्षात बसले असताना सायंकाळी ६ च्या सुमारास माजी मंत्री अनिस अहमद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली. यावेळी विखे-पाटील आणि माजी मंत्री मुत्तेमवार यांनीही आझाद यांच्याशी बोलून त्यांना झालेला प्रकार सांगितला. याच दरम्यान, विखे पाटील यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांनी ताटकळत बसवल्याबाबत माहिती दिली. हा सर्व प्रकार संपल्यानंतर पोलीस आयुक्तांनी काँग्रेस नेत्यांनी तिळगुळाचे लाडू आणि वड्या खायला दिल्या.
---

Web Title: Police Commissioner accepted the mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.