राणा दाम्पत्याच्या रॅलीवर निर्बंध; हनुमान चालीसा म्हणा, मात्र भोंग्यांना परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2022 11:04 AM2022-05-28T11:04:18+5:302022-05-28T11:19:43+5:30
Hanuman Chalisa row : राणा दाम्पत्य व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही गट नागपुरात एकाच मंदिरात हनुमान चालीस पठण करणार असून शहरातील वातावरण भक्तिमय होणार असले तरी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा व पती आमदार रवी राणा हे दाम्पत्य आज नागपुरातील हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार आहेत. याच वेळी त्याच मंदिरात राष्ट्रावादी काँग्रेसतर्फेही हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यासाठी दोन्ही गटांनी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली असता त्यांना भोंग्याविना हनुमान चालीसा पठणासाठी परवानगी देण्यात आली आहे.
राणा दाम्पत्य हे ३६ दिवसानंतर पुन्हा अमरावतीत परतणार आहे. नागपुरात आल्यानंतर हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण करून ते अमरावतीकडे रवाना होणार आहेत. पोलिसांनी त्यांना हनुमान चालीसा पठणाची परवानगी दिली असली तरी नागपूर विमानतळावरून मंदिरापर्यंतर रॅली काढण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. यासह अटी शर्थी घालण्यात आल्या असून त्याचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मंदिरात हनुमान चालीसा पठणासाठी परवानगीची गरज नाही. मात्र, बाहेर कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काही अनुचित घटना घडणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना दोन्ही आयोजकांना देण्यात आली आहे. याशिवाय राणा दाम्पत्याने विमानतळ ते मंदिरापर्यंत रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ती नाकारण्यात आली. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे हनुमान चालीसा पठण केले जाईल. त्यानंतर राणा दाम्पत्याला परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. याबरोबरच राष्ट्रवादी आणि राणा दाम्पत्य, दोघांनीही प्रक्षोभक वक्तव्य करु नये ही अट पोलिसांनी घातली आहे.