पोलीस आयुक्तांचा माफीनामा
By Admin | Published: January 31, 2017 02:34 AM2017-01-31T02:34:16+5:302017-01-31T02:34:16+5:30
हे राम, नथुराम ! नाटकाविरोधात निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळीबाराची धमकी देणे ही चूक
जनरल डायरची पदवी प्रदान उपायुक्तांनी स्वीकारला ‘सन्मान’ नाट्यमय घडामोडींवर पडदा
नागपूर : हे राम, नथुराम ! नाटकाविरोधात निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोळीबाराची धमकी देणे ही चूक असल्याचे मान्य करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस आयुक्त सोमवारी अखेर नमले. तब्बल अडीच तास काँग्रेस नेत्यांना ताटकळत ठेवल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आयुक्तालयात आले. त्यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करताना वादग्रस्त फलकाबाबत चूक झाल्याचे मान्य करीत भविष्यात पुन्हा असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यासाठी आणलेली जनरल डायरची पदवी, शाल आणि श्रीफळ पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी यांना दिले आणि या वादावर पडदा पडला.
२२ जानेवारीला वसंतराव देशपांडे सभागृहासमोर ‘हे राम नथुराम’ या वादग्रस्त नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आंदोलन करून विरोध दर्शविला होता. नागपूर पोलिसांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना एक फलक दाखवला. ‘सुनो बलवाँईयो आप का जमाव गैरकानुनी है। आप लोग यहाँसे चले जाव। नही तो आप पर पक्की गोली चलाई जायेंगी। चले जाव। चले जाव। चले जाव।’असे त्यात नमूद होते. ‘लोकमत’ने त्या फलकासंबंधाचे सचित्र वृत्त प्रकाशित केले. यानंतर समाजाच्या सर्व स्तरातून या फलकाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काँग्रेस नेत्यांनी त्याचा निषेध नोंदवून पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायरची पदवी’ देण्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस आयुक्तांना जनरल डायरची पदवी प्रदान करण्यासाठी विखे पाटील यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस नेते आयुक्त कार्यालयात धडकले. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पूर्वसूचना दिल्यानंतरही आयुक्त उपस्थित नसल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांनी आयुक्तालयात ठिय्या मांडला होता.
रस्ता सुरक्षा सप्ताह समारोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुक्त बाहेर गेले होते. त्यांनी कार्यालयात यावे म्हणून काँग्रेस नेते तब्बल अडीच तास प्रभारी सहआयक्त रंजनकुमार शर्मा यांच्या कक्षात बसले. या कालावधीत सहआयुक्त शर्मा आणि उपायुक्त (विशेष शाखा) रवींद्रसिंग परदेसी त्यांना आयुक्तांच्या वतीने आम्ही ही पदवी घेतो, अशी वारंवार विनंती करीत होते. मात्र, जोपर्यंत पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली होती. तब्बल अडीच तासानंतर काँग्रेस नेत्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. आम्ही पोलीस आयुक्तांचा पूर्ण सन्मान करू, त्यांना ही पदवी देणार नाही. त्यांच्या वतीने दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जनरल डायरची पदवी देऊ, असे पत्रकारांपुढे घोषित केले. मात्र, पोलीस आयुक्त चर्चेला आल्याशिवाय कार्यालयातून हलणार नाही, या भूमिकेवर ते ठाम राहिले. त्यामुळे अखेर रात्री ७.२० वाजता डॉ. व्यंकटेशम आयुक्तालयात आले. त्यांनी सहआयुक्तांच्या कार्यालयात बसून असलेल्या काँग्रेस नेत्यांना आपल्या कक्षात येण्याचे निमंत्रण दिले. मात्र, विखे पाटील यांनी अडीच तासापासून येथे बसून आहोत, त्यामुळे आता येथेच आयुक्तांशी चर्चा करू, असे सांगितले. त्यानंतर आयुक्त सहआयुक्तांच्या कार्यालयात आले. त्यांनी सर्वप्रथम आपल्याला यायला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर विखे पाटील यांनी वादग्रस्त फलक आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत चर्चा केली. तुम्ही (पोलिसांनी) त्याचवेळी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. असे झाले असते तर पुढचा प्रकारच घडला नसला असता, असेही लक्षात आणून दिले.
तक्रार अन् तीळगूळ
काँग्रेस नेते सहपोलीस आयुक्तांच्या कक्षात बसले असताना, सायंकाळी ६ च्या सुमारास माजी मंत्री अनिस अहमद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्याशी संपर्क करून प्रकरणाची माहिती दिली. यावेळी विखे पाटील आणि माजी मंत्री मुत्तेमवार यांनीही आझाद यांच्याशी बोलून त्यांना झालेला प्रकार सांगितला. याच दरम्यान विखे पाटील यांनी पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याशी संपर्क साधून आयुक्तांनी ताटकळत बसविल्याबाबत माहिती दिली. हा सर्व प्रकार संपल्यानंतर पोलीस आयुक्तांनी काँग्रेस नेत्यांना तीळगुळाचे लाडू आणि वड्या खायला दिल्या.
तर हक्कभंग आणला जाईल
विरोधी पक्षनेत्याचे पद घटनेने दिले असून, लोकशाहीत या पदाचे एक वेगळे स्थान आहे. त्याचा मान पोलीस आयुक्तांनी राखला नाही. त्यांचे हे वर्तन निषेधार्ह असून आपण त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांवर कारवाई केली नाही तर विधिमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, असे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
लोकमतने सर्वप्रथम या वादग्रस्त फलकाचा विषय लावून धरला. यावेळी समाजातील विविध स्तरातून पोलिसांच्या कृतीचा निषेध करण्यात आला होता.