नागपुरात पोलीस आयुक्तांची ‘फूट पेट्रोलिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:02 AM2019-03-03T00:02:04+5:302019-03-03T00:03:40+5:30
पुलवामा हल्ला आणि भारताने पाकिस्तानात शिरून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील अनेक शहरात अलर्ट घोषित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शहरातील पोलिसांच्या बंदोबस्ताची स्थिती कशी आहे, ती जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज गणेशपेठ बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात ‘फूट पेट्रोलिंग’ केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुलवामा हल्ला आणि भारताने पाकिस्तानात शिरून दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीमुळे देशातील अनेक शहरात अलर्ट घोषित करण्यात आला. या पार्श्वभूमीवर, शहरातील पोलिसांच्या बंदोबस्ताची स्थिती कशी आहे, ती जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज गणेशपेठ बसस्थानक आणि आजूबाजूच्या परिसरात ‘फूट पेट्रोलिंग’ केले.
पुलवामाच्या घटनेनंतर देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महत्त्वाच्या शहरात हायअलर्ट घोषित करण्यात आला. त्यात नागपूरचाही समावेश आहे. त्यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. शहरातील महत्त्वाच्या स्थानांभोवती मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून, गर्दीच्या ठिकाणीही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. विमानतळ मार्गासह ठिकठिकाणच्या मार्गावर नाकेबंदी करण्यात आली असून, संशयित वाहन आणि व्यक्तींची तपासणी केली जात आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानकावर समाजकंटक डाव साधू शकतात, ते लक्षात घेता पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी बंदोबस्ताची पाहणी करण्याचे आणि स्वत: ठिकठिकाणी भेट देऊन काय उणिवा आहे, ते जाणून घेण्याचे आदेश शहरातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे. स्वत: पायी रस्त्याने फिरा, असे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर, शनिवारी रात्री ७ ते ७.३० या वेळेत आयुक्तांनी गणेशपेठ बसस्थानक परिसरात पायी फिरून बंदोबस्ताची पाहणी केली. त्यांनी बसस्थानकात उभ्या असलेल्या काही बसमध्ये चढून आतमधील प्रवाशांसोबत चर्चा केली. पोलिसांनी सुरक्षेसंबंधीचे आणखी काय उपाय करायला पाहिजे, याबाबतही त्यांनी प्रवाशांकडून तसेच बसस्थानक परिसरातील छोटे दुकानदार, वाहनचालकांकडून सूचना जाणून घेतल्या. या संबंधाने त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर दिसले की अन्य पोलीस अधिकारी, कर्मचारी सतर्क होतात. ते अधिक चांगल्या पद्धतीने कर्तव्य पार पाडतात. वरिष्ठ अधिकारी दिसल्यास पोलिसांसोबत नागरिकांनाही आश्वस्त वाटते, असे सांगून आपण आज त्याचमुळे बसस्थानक परिसरात दौरा केल्याचे त्यांनी सांगितले.