हॉटेल संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलीस तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 11:46 PM2023-05-31T23:46:16+5:302023-05-31T23:46:44+5:30

Nagpur News एका तारांकित हॉटेलच्या संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Police complaint against journalist threatening hotel director | हॉटेल संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलीस तक्रार

हॉटेल संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलीस तक्रार

googlenewsNext

नागपूर : एका तारांकित हॉटेलच्या संचालकाला धमकविणाऱ्या पत्रकाराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित पत्रकाराच्या मुलासह त्याच्या मित्रांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आणि त्यावर पडदा टाकण्यासाठी पत्रकाराने आपल्या वर्तमानपत्राचा प्रभाव दाखवत बदनामी करण्याची धमकी दिली, अशा आशयाची ही तक्रार आहे.

अंजया अनपार्थी असे संबंधित पत्रकाराचे नाव असून तो ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वर्तमानपत्रात कार्यरत आहे. रामदासपेठेतील सेंटर पॉईंट हॉटेलच्या अधिकाऱ्यांकडून सिताबर्डी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेंटर पॉईंट हॉटेलचे मुख्य सुरक्षा अधिकारी पराग वालिया यांनी केलेल्या तक्रारीनुसार १३ मे रोजी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास चार मुले व मुली हॉटेलच्या लॉबीत आले व त्यांनी मद्य पुरविण्याचा आग्रह धरला. फ्रंट ऑफिस असोसिएट असलेल्या कर्मचाऱ्याने त्यांना नियमांचा हवाला देत नकार दिला. यावरून त्या मुलांनी संबंधित कर्मचाऱ्याला धमकावले. कर्मचाऱ्याने हा प्रकार सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कानावरदेखील टाकला.

यानंतर दुसऱ्याच दिवशी अंजया अनपार्थीने हॉटेलचे संचालक जसबीर सिंह अरोरा यांना दुबईत फोन केला व त्याच्या मुलाच्या मित्रांसोबत कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप लावला. अरोरा यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे निर्देश दिले. चौकशीदरम्यान सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये अनपार्थी यांचे आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले. तसे अरोरा यांनी अनपार्थीला कळविले. मात्र त्याने अरोरा यांनाच धमक्या देण्यास सुरुवात केली. ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये मी मोठ्या पदावर कार्यरत असून तुमच्या हॉटेलची सहज बदनामी करू शकतो, अशी धमकी दिली. त्यानंतर प्रत्यक्ष भेटीदरम्यान त्याने दुसऱ्या मुलाच्या वाढदिवसासाठी एक चेंबर बुक केले व सूट देण्याची मागणी केली.

१६ मे रोजीच्या पार्टीत मुलाच्या दोन मित्रांनी १३ मे रोजी वाद झालेल्या कर्मचाऱ्याला जबरदस्तीने बोलविले व त्याला शिवीगाळ करत त्याचा अपमान केला आणि धमकीदेखील दिली. शिवाय त्यांनी वेळेत चेंबर रिकामेदेखील केले नाही. पहाटे पावणेचार वाजता त्या पार्टीतील सात जण आले व त्यातील एकाने संबंधित कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचीच धमकी दिली. अनपार्थी तुमच्याविरोधात ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये बातमी देऊन पूर्ण महाराष्ट्रात हॉटेलची प्रतिष्ठा मातीत मिसळवून टाकेल अशी भाषा वापरली. दुसऱ्या दिवशी अनपार्थीने अरोरा यांची भेट घेतली. अरोरा यांनी सुरुवातीलाच सीसीटीव्ही फुटेज अनपार्थीला दाखविले. मात्र त्याने अरेरावीची भाषा वापरत मी तुमचे हॉटेल बंद करू शकतो असे म्हणत धमकी देण्यास सुरुवात केली. तुमच्या हॉटेलच्या वेळेची नियमावली मला व माझ्या मित्रमंडळींना लागू होत नाही, असे म्हणत आरडाओरड सुरू केली. अखेर अरोरा यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना बोलवून अनपार्थीला हॉटेलबाहेर नेण्यास सांगितले. यासंदर्भात सिताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांना विचारणा केली असता तक्रारीबाबत चौकशी व पुढील प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेकदा घेतले लाभ

वालिया यांच्या तक्रारीनुसार अनपार्थीने वर्तमानपत्राच्या नावाखाली अनेकदा चुकीच्या पद्धतीने हॉटेलमधील लाभ घेतले आहेत. एप्रिल महिन्यात त्याने अरोरा यांना फोन केला होता. त्याच्या मित्रमंडळींना मध्यरात्रीनंतर तीन वाजता मद्य न पुरविल्याने दंड म्हणून वेगळी पार्टी देण्यास सांगितले होते. या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी हॉटेल व्यवस्थापनातर्फे करण्यात आली आहे. या प्रकरणात अनपार्थीशी संपर्क केला असता त्याने वर्तमानपत्रातील वरिष्ठांशी बोलून प्रतिक्रिया देईल, असे सांगितले. मात्र रात्री उशीरापर्यंत प्रतिक्रियेसाठी परत फोन आला नाही.

Web Title: Police complaint against journalist threatening hotel director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.